धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यातील आंद्रूड येथील यात्रेत कुस्ती स्पर्धेच्या दरम्यान एका पैलवान व पुणे येथील डॉन असलेल्या निलेश घायवळ ‘बॉस’मध्ये सामना रंगला, या पैलवानाने भाई असलेल्या बॉसला धक्काबुक्की करीत श्रीमुखात लागवली त्यानंतर अचानक झालेल्या या प्रकारामुळे ‘घायाळ’ झालेल्या भाईच्या समर्थकांनी त्या पैलवानाची यथेच्छा धुलाई केली. या घटनेचा काही भाग कॅमेरात कैद झाला असुन व्हिडिओ व्हायरल होत आहे. या हाणामारीचे नेमके कारण कळू शकले नाही. बॉसचा धाराशिव जिल्ह्यात वावर असुन पवनचक्की यासह अन्य विषयात हातभार आहे. एकंदरीत जुन्या वादातुन हा प्रकार झाल्याचे व ठरवून बॉसचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांच्या समर्थकातून बोलले जात आहे. हल्ला करणारा जामखेड येथील असल्याचे कळते पोलीस तपास सुरु आहे.
निलेश घायवळ बॉस नावाने ओळखला जातो, हा पुण्यातल्या सराईत गुन्हेगारांपैकी एक गुन्हेगार आहे. निलेश घायवळ हा एक गुन्हेगारांचा टोळी प्रमुख असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. “बॉस” या नावाने घायवळ पुण्यात ओळखला जातो. 2002 ते 2003 या काळात गुन्हेगारी विश्वात नाव गाजवले. कुख्यात गुन्हेगार निलेश बन्सीलाल घायवळ हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील आहे आहे. शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यामध्ये आला होता आणि मास्टर इन कॉमर्सची डिग्रीपर्यंत शिक्षणही पूर्ण केले त्यानंतर त्याची भेट गजानन मारणेसोबत झाली. गजानन मारणेसोबत या दोघांनी एका गुन्हेगाराचा खून केला होता त्यानंतर त्यांनी ७ वर्षाची शिक्षाही भोगली होती. जेलमधुन बाहेर पडल्यानंतर दोघांमध्ये आर्थिक आणि वर्चस्वाच्या व्यवहाराने वाद झाला. यामध्ये घायवळ टोळीतील गुंड पप्पू गावडे खून मारणे टोळीने केला होता तर त्याच्या बदला म्हणून घायवळ टोळीने सचिन कुंडलेचा खून केला. हा रक्तरंजक थरार पुढे आणखीनही वाढत गेला आणि असेच एकमेकांच्या सहकाऱ्यांचे गँगवॉरमधुन खून होत गेले.