धाराशिव – समय सारथी
ड्रग्जचे आका ‘पुढारी’ आहेत हे समोर आले आहे मात्र सर्व ‘पुजारी’ बदनाम केले जात आहेत, वेळ पडल्यास आका कोण? हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागेल असे म्हणत पोलखोल करण्याचा इशारा शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे त्यात त्यांनी अनेक आरोप केले आहेत.
साधा देशी दारूचा गुत्ता खोलायचा असेल तरी राजकीय वरदहस्त लागतो. मग तुळजापुरात ड्रग्स मिळू लागले ते राजकीय वरद हस्ता शिवाय कसे शक्य आहे? तुळजापुरात ड्रग्सचा सुळसुळाट झाला, तो पुढाऱ्यांच्या आधारा मुळेच झाला यात शंका घेण्याचे कारण नाही. हे एकदोन दिवसात मोठे होणारे प्रकरण नाही. मागच्या चार पाच वर्षांत ते व्यसन रुजवले गेले असणार. पोरांना त्यात गोवले गेले असणार. परिणामी आज पवित्र तुळजापूर ची बदनामी राज्यभर सुरू आहे.
दारूचा जोपर्यंत हप्ता पोचतो तोपर्यंत तो गूत्ता चालतो. काहीही खटपट झाली, पुढाऱ्याशी बिनसले की दुसऱ्या दिवशी पोलीस गाडी येते अन् ते सर्व माल जप्त करतात. त्याच पद्धतीने काही राजकीय नेत्यांना काहीजण स्पर्धक म्हणून उदयास येत होते म्हणून त्यांचा काटा काढण्यासाठी याचा वापर झाला? अशी चर्चा दबक्या आवाजात सर्वजण करत आहेत. माझ्या माहिती नुसार मोठ्या राजकीय नेत्यांना तुळजापूर ड्रग्स संदर्भात माहिती खूप आधीपासून होती. फक्त स्वतःच्या राजकीय सोयीसाठी त्यांनी सर्व प्रकार चालू दिले. त्याला जबाबदार स्थानिक लोकप्रतिनिधीच आहेत हे सर्वांना कळून चुकले आहे.
माझ्यामुळेच ड्रग्स टोळी पकडली जात आहे. मिच त्यांना पकडून देत आहे. असे राणाभीमदेवी थाटात काहीजण पत्रकार परिषदा घेऊन सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आज बरेच जण श्रेय घेताना दिसत आहेत. अरे बाबा तुमचे हे यश नाही. तर ते तुमचे अपयश आहे. तुम्ही तुळजापुरातील तरुण पिढ्या बरबाद केल्या याचे श्रेय तुम्ही घेतले पाहिजे. टोळीचे प्रमुख लोक कुणाच्या जवळचे आहेत? हे लोकांना कळत नाही का?
मुळात स्थानिक तुळजापूरकर नागरिकांनी यात खरा आवाज उठवला. त्यांच्या येणाऱ्या पिढ्या डोळ्यादेखत वाया जात असल्याचे बघून त्यांनी भूमिका घ्यायला सुरुवात केली. एके दिवशी पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांच्या समोर काही गोष्टी घडल्या. अन् नवनियुक्त पालकमंत्र्यांनी पोलिसांना धारेवर धरले. म्हणून हे प्रकरण ऐरणीवर आले. पोलिसांनी ड्रग्स टोळी ची पाळमुळं खोदायला सुरुवात केली. सत्य समोर येऊ लागले. त्यामुळे खरे श्रेय तुळजापूरकर नागरिक आणि पालकमंत्र्यांचे म्हणावे लागेल. अन्यथा हा विषय दाबला गेला असता यात शंका नाही. हे प्रकरण आता जोर धरेल असे दिसताच. लोकप्रतिनिधी जागे झाले. अन् श्रेयवादासाठी किंवा स्वतःची कातडी वाचवण्यासाठी बातम्या लावल्या जावू लागल्या.
आज पर्यंत केवळ ‘मी आणि माझ्यामुळेच’ हा स्वभाव जिल्ह्याला मागास ठेवण्यात कारणीभूत ठरला आहे. जिल्ह्यात जे काही होईल ते माझ्या खानदानाच्या हातूनच होईल. इतर कुणी आवाज काढताना दिसला की त्याचा कार्यक्रम करून टाकायचा. तुळजापूर शहर मधून नेते संपवायचे अन् मांडलिक तयार करायचे. त्यातून राजकारण सोप्पे होते. कुणी आवाज उठवणारा नेता तयार होऊ नये याची खबरदारी घेतली जाते. हीच घातक प्रवृत्ति जिल्ह्याला नडली. देशातील सर्वात मागास जिल्ह्यात धाराशिवचा नंबर लागतो. कुणाची ही देण? विकास करता आला नाही. म्हणून तर लोक पुण्या मुंबईत मिळेल ते काम करून जगत आहेत. जे गरीब तरुण गावाकडे थांबले त्यातील काहीजण दारूच्या व्यसणाच्या आहारी गेले.
जे ठीक ठाक कमाई करणारे कुटुंब तुळजापुरात होते. त्यांना असले ड्रग्स चे उच्चभृ व्यसनं लावण्यात राजकारणी यशस्वी झाले. हेच म्हणावे लागेल. जे पुण्या मुंबईत ऐकायला मिळायचे त्यात तुळजापूर चे नाव जोडले गेले हे सर्वात मोठे दुःख आहे. जर आमची भावी पिढीच बरबाद होणार असेल. तर मग तो विकास आराखडा काय कामाचा? विकास कोणासाठी? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. स्वार्थी राजकारण्याच्या तावडीतून आमची सुटका लवकरात लवकर होवो हीच इच्छा