13 शाळांना भेटी – विद्यार्थी,शिक्षक,मुख्याध्यापक, केंद्रसंचालक व पर्यवेक्षक यांची 12 तास चौकशी
धाराशिव – समय सारथी
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेसाठी धाराशिव जिल्ह्यात एकूण 6 हजार 536 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.ही परीक्षा 22 डिसेंबर 2024 रोजी जिल्ह्यातील 19 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.परीक्षेचा निकाल 4 एप्रिल 2025 रोजी राज्य परीक्षा परिषद,पुणे यांनी जाहीर केला. निकालाचा आढावा घेतला असता, केंद्र क्र. 8214 वसंतदादा पाटील हायस्कूल,लोहारा येथे 271 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील 125 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.तर उर्वरित 18 केंद्रांतील 6 हजार 265 विद्यार्थ्यांपैकी केवळ 90 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.त्यामुळे वसंतदादा पाटील हायस्कूल केंद्रावर सामूहिक कॉपीचा संशय व्यक्त करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली होती.या समितीने 8 एप्रिल रोजी संबंधित केंद्राच्या अंतर्गत 13 शाळांना भेट देऊन विद्यार्थी,शिक्षक,मुख्याध्यापक, केंद्रसंचालक व पर्यवेक्षक यांची 12 तास चौकशी केली.त्यानंतर सविस्तर अहवाल परीक्षा परिषद,पुणे येथे सादर करण्यात आला.ही परीक्षा राज्य परीक्षा परिषद,पुणे मार्फत घेतली जाते.त्यामुळे संबंधित गैरप्रकारांवर आवश्यक कार्यवाही व परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय परीक्षा परिषदेचे आयुक्त यांच्याकडून घेण्यात येणार आहे.