तेरणा कारखाना – भविष्य निर्वाह विषय व प्रत्यक्ष ताबा लवकर देणे गरजेचे
मार्च एप्रिलमध्ये चाचणी करण्याचा भैरवनाथचा संकल्प
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी कारखाना आगामी 25 वर्षासाठी आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समूहाला देण्यात आला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तेरणा यावर्षीच्या गळीत हंगामात सुरू करण्यासाठी भैरवनाथ समूह प्रयत्न करीत असुन मार्च – एप्रिल महिन्यात चाचणी गळीत हंगाम सुरू करण्याचा संकल्प आहे . तेरणा लवकर सुरू करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी विभागाची देणे व नंतर भाडेतत्वावर देण्याचा करार करून प्रत्यक्ष कारखाना भैरवनाथ समूहाच्या ताब्यात देणे गरजेचे आहे. भविष्य निर्वाह विभाग व इतर प्रक्रिया प्रलंबीत पडल्यास या गळीत हंगामात तेरणेचा धुराडा पेटणे अवघड होणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाचा असलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भैरवनाथ समूहाला भाडेतत्वावर दिल्यानंतर तेरणा भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तेरणा साखर कारखान्याला सध्या भविष्य निर्वाह विभागाने सील ठोकले असून भविष्य निर्वाह निधीची 5 कोटी देणे व त्यावरील व्याज असे 10 कोटी देणी बाकी आहेत. ही देणी दिल्यावरच तेरणाचे सील निघणार असुन कारखाना भैरवनाथला देणे शक्य होणार आहे. भाडेतत्वावर लिलाव प्रक्रियेतुन 5 कोटी मिळाली असून उर्वरित व्याजाच्या रकमेची हप्ता पाडून घेणे गरजेचे आहे. व्याजाच्या रकमेचे 36 हप्ते पाडून देण्याची व सील काढण्याची प्रक्रिया लवकर झाली तरच कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा देता येणार आहे. ही सर्व कागदोपत्री प्रक्रिया दिल्लीच्या कार्यालयात होणार असुन त्यादृष्टीने संचालक मंडळाची बैठक होणे गरजेचे आहे.
तेरणा कारखानाचा प्रत्यक्ष ताबा दिल्यानंतर मशिनरी व इतर यंत्रणेची चाचणी करण्यासाठी किमान 3 महिन्याचा कालावधी लागणार आहे. कारखान्यात मशिनरीमध्ये कुठे लिकेज आहे का ? त्याची स्तिथी व्यवस्थित आहे का याची तपासणी केल्यानंतर लिकेज पाहिले जातील. मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कारखान्याचा चाचणी घेण्याचा मानस असून त्या दृष्टीने भैरवनाथची यंत्रणा तयार आहे मात्र पीएफ व करार हे विषय वेळेत मार्गी लागणे गरजेचे आहे. तेरणा भैरवनाथकडे गेल्याने तेरणा लवकर सुरू होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.