धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील शासकीय रुग्णालयालात बनावट औषध पुरवठा केल्या प्रकरणी 4 जणा विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. बनावट औषध पुरवठा करुन रुग्णाच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या कांडात कोण कोण सहभागी आहे व याचा मास्टर माईंड कोण हे समोर येणे गरजेचे आहे.
आरोपी हेमंत मुळे, महादेवी मुळे ( लातुर, जया एंटरप्रायझेस ) मिहीर त्रिवेदी भिवंडी ठाणे, विजय चौधरी मीरा रोड ठाणे या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 336(3), 340(2) 268 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घातक पदार्थाची भेसळ, मानवी जीव धोक्यात घालणारे कृत्य,फसवणूक करण्याच्या हेतूने खोटे दस्तऐवज तयार करणे, सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणे याचा समावेश आहे.
औषध निरीक्षक स्वाती कुपकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या 4 जणांनी संगणमत करुन बनावट कागदपत्रे तयार करुन 4 ऑक्टोबर 2024 ते 19 डिसेंबर 2024 या काळात बनावट औषध पुरवठा करुन शासनाची करोडो रुपयांची फसवणूक केली. औषधे रुग्णाच्या आरोग्यास धोकादायक आहेत हे माहिती असतानाही त्यांनी पुरवठा केला. यात अन्न व औषध प्रशासनाने पुरवठा करणाऱ्या 4 जणांवर गुन्हा नोंद केला आहे मात्र जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी, बिले मंजुर करणारे, औषध गुणवत्ता नियंत्रक यासह अन्य लोकांना अभय दिल्याचे दिसते, त्यामुळे याचा मास्टर माईंड कोण हे पोलिस तपासात समोर येणे गरजेचे आहे.