भोसले हायस्कूल राडा प्रकरण – शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी विद्यार्थीसह 3 जणांवर 307 चा गुन्हा नोंद
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद येथील शिक्षणासाठी नामांकीत असलेल्या श्रीपतराव भोसले हायस्कुल येथे शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी विद्यार्थीसह त्याचा भाऊ व वडिलांवर कलम 307 प्रमाणे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आनंद नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.दरम्यान या प्रकरणात दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप होत असुन मस्के याला शिक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. विद्यार्थीने शिक्षकाच्या खिशातील पैसे व सोने का पळविले ? यासह अनेक बाबी पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहेत. भोसले हायस्कूलच्या आवारात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही आहेत त्यामुळे हा प्रकार त्यात कैद झालेला असू शकतो. शिक्षक व विद्यार्थी राडा प्रकरणाचे सत्य सीसीटीव्हीत असल्याने तपासाकडे लक्ष लागले आहे.
भोसले हायस्कुल येथील क्रीडा शिक्षक राजाभाऊ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या शाळेत 12 वीच्या वर्गात शिकत असलेला पृथ्वीराज मस्के हा विद्यार्थी शाळेतील परिसरात रस्त्यावर बुलेट आडवी लावून मुलींची छेड काढत होता, याबाबत काही मुलींनी तक्रार केल्यानंतर शिक्षक पवार यांनी याबाबत पृथ्वीराज मस्के याला जाब विचारला असता तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली. त्यानंतर काही वेळाने तो एकाला घेऊन आला व पृथ्वीराज याने लोखंडी गजाने शिक्षक पवार यांच्या डोक्यावर वार केला तो चुकवल्याने नाकावर लागल्याने गंभीर दुखापत होऊन ते रक्तबंभाळ झाले यावेळी शिक्षक शशिकांत जाधव व आंबेवाडीकर तिथे आले आणि मस्के याच्या तावडीतून सुटका केली.
मारहाणीत पैसे व 2 तोळ्यांचे लॉकेट पळविले
विद्यार्थी मस्के याने पवार यांना मारहाण करीत असताना त्याने शिक्षक पवार यांच्या पँटच्या पाठीमागील खिशात ठेवलेले 6 हजार 390 रुपये काढून घेतले तर त्याच्या सोबत असलेल्या मुलाने शिक्षक पवार यांच्या गळ्यातील लॉकेट तोडून नेले. त्यानंतर या दोघांना प्राचार्य यांच्या केबिनमध्ये आणले असता तिथे पृथ्वीराज याचे वडील भाऊराज मस्के हे तिथे आले व त्यांनी शिक्षक पवार यांना जाब विचारत तुमच्यावर अट्रोसिटी करतो असे म्हणत शिक्षक पवार यांना मारहाण केली. पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी दिलेल्या फिर्यादिवरून पृथ्वीराज मस्के, यशराज मस्के व भाऊराज मस्के या 3 जणांवर कलम 307, 327,323,504 व 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे हे तपास करीत आहेत.