गर्भलिंग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन – डॉक्टरास दीड वर्षाचा कारावास व 10 हजाराचा दंड
उस्मानाबाद – समय सारथी
गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये वाशी येथील भागवती हॉस्पीटलचे डॉ. तुकाराम रामकृष्ण करडे यास भूम येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्ष सहा महिने शिक्षा आणि दहा हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.
डॉ.करडे यांनी गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंधक कायदा 1994 चे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणात वाशी येथील तत्कालीन प्रथम न्याय दंडाधिकारी यांनी डॉ.करडे यास एक वर्ष सहा महिने शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड इतकी शिक्षा सुनावली होती.या शिक्षेच्या विरोधात डॉ. करडे यांनी भूम येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागीतली होती. या प्रकरणात सरकारी पक्ष आणि डॉ.करडे यांची बाजू ऐकून घेवून आरोपीने दाखल केलेले अपील फेठाळण्यात आले आहे.
वाशी येथील प्रथम वर्ग न्यायदंडधिकारी यांनी दिलेली एक वर्ष सहा महिने कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ही शिक्षा भूम येथील जिल्हा व सत्र न्यायालयान कायम ठेवली आहे.
यावेळी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड.किरण कोळपे यांनी बाजू मांडली. या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के. पाटील,डॉ.दत्तात्रय खुणे,डॉ.सचिन बोडके, PCPNDT सेलच्या विधी सल्लागार ॲड. रेणुका शेटे यांचे विशेष सहकार्य लाभले.
यापुढे उस्मानाबाद जिल्हयातील सर्व सोनोग्राफी धारकांनी आणि एमटीपी धारकांनी कोणतेही गैरप्रकार होणार नाही तसेच कायद्याचे उल्लघंन होणार नाही यांची दक्षता घ्यावी,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक तथा जिल्हा समुचित प्राधिकारी (PCPNDT) डॉ.धनंजय पाटील यांनी केले आहे.