धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा मजुर सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली त्यानिमित्ताने अनेक जन हे ‘कागदोपत्री’ मजुर असल्याची बाब समोर आली. यातील काही जन तर साखर कारखान्याचे मालक, करोडपती, आयकर भरणारे व लाखोंची संपत्ती असणारे आहेत. केवळ सहकारी संस्था माध्यमातून आर्थिक व राजकीय लाभ मिळावा यासाठी ‘कागदोपत्री’ मजुर बनले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील कोणत्या एका राहयो रस्त्याच्या व इतर कामावर ही करोडपती मजुर मंडळी अंगमेहनतीचे काम करताना दिसले तर जनतेला आश्चर्य वाटायला नको.
धाराशिव जिल्ह्यात 345 मजुर संस्था कार्यरत असुन धाराशिव तालुका 87, तुळजापूर 46,उमरगा 50, भुम 32, परंडा 51, कळंब 39, वाशी 26 व लोहारा तालुक्यात 14 संस्था आहेत. मजुर सहकारी संस्थेचा सदस्य होण्यासाठी तो व्यक्ती मजुर असणे गरजेचे असुन त्याने संस्थेच्या कामात प्रत्यक्ष सहभाग घेणे गरजेचे आहे. मजुरांचा उदरनिर्वाह व्हावा व त्यांना रोजीरोटी मिळावी हा मजुर सहकारी संस्थाचा व्यापक दृष्टीकोन आहे. यासाठी बांधकाम विभाग, जिल्हा परिषदसह अन्य भागातून 33-33-34 टक्के कामवाटप नियमानुसार मजुर संस्थांना कामे दिली जातात. संस्थांनाचे काम व अनुभव नुसार अ व ब गट वर्गीकरण केले जाते. प्रत्यक्ष राबणारे, कष्ट करणारे व कामातून आर्थिक फायदा घेणारे असे 2 वेगवेगळे लाभार्थी असल्याचे संस्था यादीवरून दिसते. मजुर संस्थांना देण्यात आलेल्या कामाची शिफारस मजुर फेडरेशन करते त्यात 1 टक्का माध्यमातून दरवर्षी करोडो रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार होतो.
संस्था ताब्यात असण्याचा धाराशिव जिल्ह्यात टोकाचा हव्यास आहे, एकाच घरात पती-पत्नी यांच्या वेगवेगळ्या संस्था आहेत. मजुर सहकारी संस्थेच्या सभासदरुपी मजुराकडे रोजगार जॉब कार्ड, मजुर असल्याचे शपथपत्र व इतर कागदपत्रे असणे गरजेचे आहे. मजुर नसताना लाभ घेतल्यास त्या संस्थेवर व सदस्यावर चौकशी व सुनावणी अंती कारवाई केली जाते, त्यात सदस्यत्व रद्द ते संस्था नोंदणी रद्द इतकी कारवाईची तरतूद आहे. धाराशिव जिल्ह्यातील 345 कार्यरत संस्था व त्यातील सदस्य यांची, सदस्य पात्रता नियम संपत्ती याची चौकशी करण्याची मागणी होत आहे, खोटी माहिती व कागदपत्रे दिल्या प्रकरणी फसवणूकीचा फौजदारी गुन्हा नोंद करणे गरजेचे आहे. खऱ्या मजुरांना न्याय मिळावा यासाठी दैनिक समय सारथीचा पाठपुरावा असणार आहे.
निवडणुकीत एका मतदार असलेल्या मजुराला खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी थेट दिल्लीवरून विमान प्रवास करुन आणले असल्याचा दावा भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी प्रसार माध्यमाना दिलेल्या प्रेस नोटमध्ये केला आहे, त्यावरून ही निवडणुक किती प्रतिष्ठेची व खर्चिक आहे हे लक्षात येते. मजुराच्या विमान प्रवासाच्या निमित्ताने खरे व ‘कागदोपत्री’ मजुर कोण हे तपासण्याचा मुद्दा समोर आला असुन मजुर ‘करोडपती’ ही वृत्तमालिका.