खडाजंगी, घमासान – सम समान निधी वाटप व महावितरण बिलावरून वाद
पालकमंत्री गडाख , खासदार ओमराजे यांना धरले धारेवर – कोर्टात जाण्याची तंबी
आमदार डॉ तानाजीराव सावंत यांचा बैठकीत आक्रमक पवित्रा
ठेकेदार कोण ? कोणाचा वरदहस्त ? याचीच चर्चा
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेत पालकमंत्री शंकरराव गडाख,खासदार ओमराजे निंबाळकर यांना चांगलेच धारेवर धरले. सम-समान निधी वाटप, अखर्चित निधी, प्रशासकीय मान्यता न घेता महावितरण विभागाने केलेली 5 कोटींची कामे यासह शेतकऱ्यांच्या अन्य मुद्यावर आवाज उठवल्याने चांगलीच खडाजंगी झाली. आमदार सावंत यांच्या या पावित्र्याने चांगलीच गोची,अडचण झाली व सत्ताधारी नेतृत्वाची बोलती बंद पडली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यात विकास कामांच्या निधीचे सम-समान वाटप व्हावे अशी आग्रही मागणी आमदार डॉ सावंत यांनी लावून धरली. उस्मानाबाद- कळंब तालुक्याला रस्ते कामासाठी 6 कोटी 50 लाख निधी दिला तर भूम परंडा मतदार संघात 1 कोटी 80 लाख रुपये देण्यात आले याच प्रमाणे इतर कामात ही निधीचे वापट कमी- जास्त केले हे निदर्शनास आमदार सावंत यांनी आणून दिल्यावर लोकसंख्याच्या तुलनेत सम समान वाटप करण्याचे ठरले.
महावितरणची 5 कोटी रुपयांची कामे प्रशासकीय मान्यता न घेता केल्याने त्याचे बिल अदा करू नये असा पवित्रा सावंत यांनी घेतला त्या बिलाच्या मुद्यावरून खासदार ओमराजे यांच्यात चांगलीच शाब्दिक जुंपली. महावितरणची कामे कोण केली ? ठेकेदार कोण यासह अन्य मुद्दे यावेळी चर्चेले गेले त्यावर कामे तुम्हीच करा? तुम्हीच ठरवा ? असे सावंत यांनी खासदार ओमराजे यांना सुनावले. महावितरणची बिले अदा केल्यास भ्रष्टाचाराचे आरोप करून याबाबत कोर्टात जाण्याची तंबी आमदार सावंत यांनी दिली. या विषयात गुत्तेदार हे काही शेतकरी यांच्याकडुन पैसे घेत आहेत शिवाय शासकीय बिल असा डबल मलिदा खाण्याच्या प्रयत्नात आहेत अश्या तक्रारी प्राप्त आहेत. दरम्यान महावितरण ची कामे प्रशासकीय मान्यता विना करणारे ठेकेदार कोण? त्यांना कोणाचे पाठबळ ? याची चर्चा होत आहे.
प्रत्येक गोष्ट कारवाई किंवा बिले अडवून करता येणार नाही, यापुढे चुका होणार नाहीत याची काळजी घ्या असे पालकमंत्री गडाख यांनी सांगत काही विषयावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला तर आमदार कैलास पाटील यांनी मौन धारण करणे पसंद केले.
महावितरण व इतर केलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाली नाही तर पालकमंत्री यांची तक्रार थेट मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याची तंबी सावंत यांनी पालकमंत्री यांना दिल्याचे समजते.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी वार्तांकन करण्यासाठी पत्रकार यांना प्रवेश द्यावा हा मुद्दा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी उपस्थित केला यावर पालकमंत्रीसह जिल्हाधिकारी व इतरांनी मौन बाळगले तर पत्रकार परिषदेत हा मुद्दा आल्यावर पालकमंत्री यांनी याबाबत सकारात्मक विचार करू असे सांगितले.