चिंताजनक ? युएईहुन उस्मानाबादला आलेला एक जण कोरोना पॉझिटिव्ह
ओमीक्रॉन अनुषंगाने तपासणी होणार – प्रशासकीय असमनव्य ? अनेक आदेश कागदावरच ?
उस्मानाबाद – समय सारथी
शारजा,युएई ( संयुक्त अरब अमिरात ) हुन उस्मानाबाद जिल्ह्यात आलेला एक 42 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडली असुन आरोग्य यंत्रणा सतर्क झाले आहे. उस्मानाबाद तालुक्यातील बावी या गावातील हा पुरुष असून त्यांची तपासणी केल्यावर तो पॉझिटिव्ह सापडला आहे. ओमीक्रॉन अनुषंगाने या रुग्णाचे नमुने जिनोम तपासणीसाठी एनआयव्ही ला पाठविण्यात येणार आहेत त्याचा अहवाल येण्यासाठी 3 दिवस लागू शकतात. दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात मास्क घालणे, लस नसेल तर शासकीय कार्यालयात प्रवेश नाही यासह इतर आदेशांचे पालन होताना दिसत नाही. अनेक उपाययोजना व आदेश हे कागदावरच असल्याचे दिसते.
उस्मानाबाद जिल्ह्यात परदेशातून गेल्या पंधरवाड्यात किंवा महीन्यात किती रुग्ण आले याची ठोस माहिती महसुल किंवा पोलीस विभागाकडुन न मिळाल्याने प्रशासकीय असमनव्य दिसून आला. विशेष म्हणजे पालकमंत्री यांनी याबाबत स्वतः नोंदी ठेवण्याचे आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ओमीक्रॉनचा धोका हा सध्या तरी परदेशातून प्रवास करून आलेल्या व्यक्तीपासून जास्त आहे त्या अनुषंगाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व इतर उपाययोजना होणे गरजेचे आहे.
गुरूवारी उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 6 नवीन रुग्ण सापडले तर 7 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. जिल्ह्यात गुरुवारी 1 हजार 333 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली मात्र त्यापैकीव6 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत, हा दर 0.22 टक्के आहे. 6 पॉझिटिव्ह रुग्णपैकी 1 बावी, 3 तुळजापूर व 2 माकणी लोहारा येथील आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 65 हजार 604 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 96.90 टक्के आहे तर 67 हजार 699 पैकी 1 हजार 503 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे त्यामुळे मृत्यूचे प्रमाण हे 2.22 टक्के इतके आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 1503 मृत्यू तर 360 मृत्यू हे जिल्ह्याबाहेर उपचार घेत असताना झाले आहेत. 107 जणांचा मृत्यू हा दुर्धर आजार असल्याने झाला आहे तर पोस्ट कोविडमुळे 108 रुग्णांचा मृत्यू झाला. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.