धाराशिव – समय सारथी
विकास कामांना स्थगिती कोणाच्या सांगण्यावरून ? असा सवाल करीत आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का? असे त्या व्हिडिओत आहे.
धाराशिव जिल्ह्याचा भरभरून विकास होणार, कायापालट होणार, अशा वल्गना सातत्याने केल्या गेल्या. निवडणुकीच्या काळात घोषणांचा पाऊस पाडला. पण, वास्तवात काय ? काहीच नाही. धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचा कणा असलेली नियोजन समिती ४०८ कोटींच्या निधीतून विकास कामाला हातभार लावते. मात्र, याच समितीने आता २५० कोटीपेक्षा जास्त निधीच्या कामांच्या प्रशासकीय मान्यतांना स्थगिती दिली आहे. एकीकडे सभागृहात मोठ्याने स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही म्हणायचे आणि दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील इतक्या मोठ्या कामांना स्थगिती द्यायची.. यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत, हे सर्वांनाच आता कळून चुकले आहे.
तत्कालीन शिंदे सरकार सत्तेत येताच जिल्ह्यासाठी मंजूर असलेला शेकडो कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली. ती कामे आज तीन वर्षे उलटत असतानाही झाली नाहीत. आता फडणवीस सरकार आले तरी काही बदल दिसत नाही.आकांक्षित जिल्ह्याकडे विशेष लक्ष देऊन गतीने विकास साधण्याची जबाबदारी सरकारची असते. इथे मात्र स्थगिती देऊन उलटी गंगा प्रवाहित केली जात आहे. धाराशिव जिल्हा विकासापासून वंचित ठेवणाऱ्या या सरकारचा वेळ आल्यावर लोक बरोबर हिशोब करतील, हे लक्षात असू द्या.