धाराशिव – समय सारथी
धाराशिवची संस्कृती बिघडवतोय कोण ? हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. धाराशिव शहरात 2 ठिकाणी विनापरवाना मसाज पार्लर सुरु करण्यात आले आहेत, या ठिकाणी मसाजच्या नावाखाली खुलेआम अनैतिक प्रकार सुरु असल्याची कुणकुण लागताच पोलिसांनी पावले उचलत चौकशी सुरु केली आणि या प्रकाराला वेळीच लगाम लागला. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी चौकशी व हालचाली सुरु करताच हे सेंटर तात्पुरते ‘शटर डाऊन’ करण्यात आले आहेत. मसाज पार्लरसाठी स्थानिक प्रशासन व पोलिसांची नाहरकत लागते मात्र पर्याप्त कागदपत्रे नसताना ही केंद्र सुरु करण्यात आली आहे. मुंबई पुणे येथील ही वाईट संस्कृती धाराशिव शहरात कोण आणली ? याला पाठबळ कोणाचे ? ड्रग्जनंतर मसाज पार्लर अशी धाराशिवची संस्कृती बिघडवतोय कोण ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहिले आहेत. धाराशिव जिल्ह्यात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, यासाठी पर्याप्त उपाययोजना केल्या जातील, थारा दिला जाणार नाही असे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी यानिमित्ताने सांगितले.
धाराशिव शहरातील मुख्य वस्तीत असलेल्या ठिकाणी मसाज पार्लर सुरु करण्यात आले आहेत. इथे आल्यावर 1 ते 2 हजार रुपयांचे पॅकेज घ्यायचे व अंधाऱ्या खोलीत आत रूममध्ये गेल्यावर मुलीसोबत ‘अर्थ’ पुर्ण व्यवहार करुन हवे ते ‘हेवन’ सुख मिळेल असा दावा केला जातो. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकजवळ असलेल्या एका कॉम्प्लेक्स व ज्ञानेश्वर मंदीर परिसरात हे सेंटर सुरु करण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणी 3-4 मुली मसाज सेवा देण्याचे काम करतात मात्र त्याना सुट्टीवर पाठवल्या आहेत. शहरातील ज्या कॉम्प्लेक्समध्ये हे सेंटर सुरु आहे त्या जागेचा मालक हा नगरसेवक असुन एका राजकीय पक्षाशी संबंधित असुन त्यांनी नुकतेच पक्षांतर केले आहे, या व्यवसायाला राजकीय पाठबळ तर नव्हे ना असा प्रश्न विचारला जात आहे, संबंधित लोकप्रतिनिधी मात्र यावर गप्प आहेत, बेरजेच्या व सोईच्या राजकारणात काहींना धन्यता वाटते. या सेंटरला ‘अक्षय’ ऊर्जा राजकारनाच्या माध्यमातून पुरवली जात असल्याचा संशय आहे.
विशेष म्हणजे या मसाज पार्लरचे व्यवस्थापन हे सोलापूर व उत्तर प्रदेशातील काही टोळ्या करीत आहेत. मुंबई, पुणे येथील तरुणीना इथे आणुन त्यांच्याकडुन विविध सेवा दिल्या जात आहेत. उत्तर प्रदेश ते धाराशिव हे ‘पार्लर कनेक्शन’ हे न उलघडलेले कोडं आहे. कोणतीही परवानगी न घेता मसाज सेंटर कोणाच्या आशीर्वादामुळे व पाठबळामुळे सुरु झाले हे समोर येणे गरजेचे आहे. ड्रग्ज मुळे जसे तुळजापूर बदनाम झाले तसे आगामी काळातमसाज पार्लर मुळे धाराशिव बदनाम होऊ नये अशी सामान्यांना अपेक्षा आहे, यात तरुण पिढीचे नुकसान होऊ शकते.
धाराशिवचा किती विकास झाला हा संशोधनाचा विषय आहे मात्र तुळजापूर येथे ड्रग्ज व धाराशिव शहरात मसाज पार्लर आले व त्यात काही स्थानिक राजकीय नेत्याचा सहभागी व आधार आहे हे मात्र नक्की. विनापरवाना सुरु केलेल्या मसाज पार्लरवर व जागा मालकांवर पोलिसांनी चौकशीअंती गुन्हा नोंद करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी करडी नजर ठेवायला सुरुवात केल्यावर हे सेंटर डाऊन केले असले तरी अधुनमधुन उघडून काय होते का ? नजरचुकवुन व योग्य वेळेची वाट हे लोक पाहत आहेत जेणेकरुन छुप्या पद्धतीने पुन्हा सुरु करता येतील.
थाई, स्विडीश, डीप टिशू, हॉट ऑइल व हॉट स्टोन,अरोमा, शियात्सू,बालीनिज, अक्यूप्रेशर, लिंफॅटिक ड्रेनेज व इतर थेरपी असलेले मसाज सेंटर विविध परवानगी, प्रशिक्षित स्टाफ व इतर माहिती देऊन अधिकृतरित्या सुरु करता येतात मात्र त्याच्या नावाखाली अनैतिक प्रकार करणे हा कायदेशीर गुन्हा आहे.