घरचा आहेर, पोलखोल – आढावा बैठकीचे निमंत्रण नव्हे, आमदार ज्ञानराज चौगुले यांचा धक्कादायक खुलासा
चौगुले यांच्या खुलाश्याने मंत्री सावंत गटाचा खोटारडेपणा उघड – आगपाखड, खोटे दावे कशासाठी ?
धाराशिव – समय सारथी
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी घेतलेल्या आढावा बैठकीचे निमंत्रण नव्हते, त्यामुळे मी येण्याचा प्रश्नच नव्हता. निमंत्रण किंवा दौऱ्याची कल्पना दिली असती तर मी नक्की आलो असतो. मला या विषयात व राजकारणात पडायचे नाही मात्र निमंत्रण नव्हते हे सत्य आहे. ज्या कोणाला माझा राजीनामा हवा आहे त्यांनी तसे स्वतः सांगावे, मी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करतो. असे सांगत आमदार चौगुले यांनी घरचा आहेर देत मंत्री सावंत गटाची पोलखोल केली.
सलग 3 टर्म विजयाची हॅट्रिक करणारे आमदार चौगुले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातील आहेत त्यामुळे आगामी काळात निमंत्रणाचा विषय थेट मुख्यमंत्री यांच्या दरबारात जाऊ शकतो.
आढावा बैठकीचे सर्व आमदार व खासदार यांना निमंत्रण प्रशासना मार्फत दिले असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंके, सुरज साळुंके यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.
आमदार चौगुले यांना निमंत्रण दिले होते मात्र ते बाहेर गावी मुंबई येथे मंत्री सावंत यांची परवानगी घेऊन गेले होते. ते बैठकीला आले नाहीत मात्र त्यांनी उमरगा मतदार संघातील प्रश्न, समस्या याची यादी पाठवून दिली होती त्यानुसार आढावा मंत्री सावंत यांनी घेल्याचा दावा सावंत गटाने पत्रकार परिषदेत केला मात्र ज्यावेळी आमदार चौगुले यांना याबाबत विचारले असता त्यांनी असे काही घडलेच नाही असे सांगत स्पष्ट नकार दिला.
सावंत हे पालकमंत्री झाल्यानंतर 1 वर्ष झाली तरी त्यांनी उमरगा, लोहारा, तुळजापूर या तालुक्यात जनता दरबार, आढावा बैठका घेतली नाही यावर बोलताना सावंत गटाने सांगितले की येत्या महिन्यात या बैठका घेतल्या जातील.