व्हीआयपी पास घोटाळा – मंदीर स्वच्छता, सुरक्षा, पार्किंग, साडी, नारळ सगळे टेंडर यांना, जबाबदारी स्वीकारा – व्यसनाचे तीर्थक्षेत्र ओळख
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीत जी गोपनीय नावे व नवीन आरोपी समोर आले त्यात माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद जमदडे, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे यांचा समावेश आहे. हे सर्वजण आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी संबंधित आहेत. हे आरोपी भाजपशी संबंधित आहेत, गेल्या 3-4 वर्षांपासुन हा ड्रग्जचा काळा धंदा सुरु होता हे आमदार पाटील यांना माहिती होते. पाटील हे राष्ट्रवादीतुन भाजपमध्ये आले तेव्हा ही मंडळी त्यांच्या सोबत भाजपात आली, शहरी व ग्रामीण भागातील पक्षाचे, निवडणुकीचे काम हे पाहत होते त्यामुळे आमदार पाटील यांनी जबाबदारी व नैतिकता स्वीकारून आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. व्यसनाचे तीर्थक्षेत्र अशी तुळजापूरची ओळख झाली असुन ती यापुढे होऊ नये असे ते म्हणाले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला असेल मात्र मी स्वाभिमानाने लढलो. सर्वसामान्य जनतेने 96 हजार मते दिली, पैसा खर्च न करता मिळालेली मते ही स्वाभिमान व निष्ठेची मते आहेत, त्यामुळे मी वैफल्याग्रस्त नाही. एक नागरिक म्हणुन आम्ही बोलत आहोत, अनेक घरे ड्रग्जमुळे उध्वस्त झाली आहेत. जवळपास 200 ते 250 लोकांना नोटीसा दिल्या असुन ज्याचे आर्थिक व्यवहार झाले आहेत ते तपासले जात आहेत. पक्षपात न करता चौकशी करुन जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी मात्र सुड बुद्धीने कारवाई करु नये अशी मागणी धीरज पाटील यांनी केली. पोलिसांनी कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
आमदार पाटील म्हणतात की माझ्यमुळे कारवाई झाली, हात खोलवर गेल्यावर बरबटल्यावर त्यांनी स्वतःची प्रतिमा खराब होऊ नये म्हणुन कारवाई करायला सांगितली. मुख्य आरोपीनी मकोका लावावा अशी मागणी केली. आमदार यांनी सुद्धा ही मागणी करावी असे ते म्हणाले. अनेक जन म्हणत आहेत की 2-3 दिवसात आम्ही पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहेत, काही आरोपी आज पवित्र झाल्यासारखे वागत आहेत. यात्रा अनुदान, घरकुल, सुनील प्लाझा या घोटाळ्यात हयातील काहीजण होते. तुळजापूरचे राजकारण हे मंदीराभोवती असुन मंदीर स्वच्छता, सुरक्षा, पार्किंग, साडी, नारळ, चिंतामणी ही सगळी टेंडर यांच्याकडे आहेत, इतके सगळे असताना ड्रग्जमधुन कमाई करुन लोकांची घर उध्वस्त केली. तुळजापूरचे नाव ड्रग्ज प्रकरणामुळे बदनाम झाले आहे, याला राजकीय वरदहस्त कोणाचा ? मंदिरात व्हीआयपी पास घोटाळा सुरु असुन 200 पास दिले जातात तेचं पास पुन्हा फिरून वापरले जातात असा आरोप केला.