अटकपुर्व जामीन मंजुर – संस्थाचालक व्यंकटराव गुंड यांना कोर्टाकडुन दिलासा
उस्मानाबाद – समय सारथी
संस्थेतील सहशिक्षकाची वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करून ती मंजूर करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागून 25 हजारांची लाच स्वीकारले प्रकरणातील संस्थाचालक व्यंकटराव गुंड यांना उस्मानाबाद कोर्टाने दिलासा दिला आहे. गुंड यांचा अटकपुर्व जामीन अर्ज मंजुर करण्यात आला आहे. गुंड यांच्या अर्जावर शनिवारी सुनावणी झाली होती मात्र कोर्टाने निकाल राखीव ठेवला होता. या प्रकरणात गुंड यांच्या वतीने ऍड मिलिंद पाटील यांनी काम पाहिले.
भाजप नेते तथा नामांकीत रुपामाता समुहाचे अध्यक्ष व्यंकटराव गुंड यांच्यासह मुख्याध्यापक राजेंद्र सूर्यवंशी व सहशिक्षक अमोल गुंड यांच्यावर बेंबळी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या लाच प्रकरणी मुख्याध्यापक सूर्यवंशी व सहशिक्षक अमोल गुंड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. व्यंकट गुंड हे व्यवसायाने उद्योजक, शिक्षणसम्राट, बँकेचे चेअरमन,वकील आहेत. व्यंकट गुंड यांना लाचलुचपत विभागाने लाचेच्या कटात मुख्य आरोपी केले आहे.
संस्थेच्या बांधकाम निधीच्या नावाखाली 50 हजार रुपये लाच म्हणून मागण्यात आली त्यात 25 हजारावर व्यंकट गुंड व मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी सेटलमेंट केली असा आरोप आहे. संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी शिक्षकाला 50 हजारांची लाच मागितली आणि 25 हजार रक्कम अंतीम केली, लाचेची ही रक्कम स्वतः न स्वीकारता एका सहशिक्षक अमोल गुंड याला घ्यायला लावली. पाडोळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक महाविद्यालय येथे लाचलुचपत विभागाने कारवाई केली.