ओमीक्रॉनचा 3 रा रुग्ण बावी येथे सापडला – 13 वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह
दिलासा – सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा रुग्ण
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथे ओमीक्रॉनचा 3 रा रुग्ण सापडला असून 13 वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बावी येथे अगोदर ओमीक्रॉनचे 2 रुग्ण पॉझिटिव्ह आले होते त्यांच्या संपर्कातील ही मुलगी पॉझिटिव्ह आली आहे, ही बाब चिंताजनक असली तरी उस्मानाबाद जिल्ह्यात सलग दोन दिवस कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही ही दिलासादायक बाब आहे. मंगळवारी कोरोनाचा उपचार घेतल्यानंतर 4 रुग्ण बरे झाले त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ 13 सक्रीय रुग्ण आहेत, जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मंगळवारी 1 हजार 379 नमुने तपासण्यात आले त्यात एकही नमुना पॉझिटिव्ह आला नाही.
शारजा,युएई (संयुक्त अरब अमिरात) हुन उस्मानाबाद जिल्ह्यात आलेला 42 वर्षीय पुरुष रुग्ण व त्याच्या संपर्कातील कुटुंबातील एक जण पॉझिटिव्ह आल्यानंतर आता 13 वर्षाची मुलगी पॉझिटिव्ह आली आहे.बावी येथील या तरुणाच्या संपर्कातील आणखी काही जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत मात्र त्यांचा ओमीक्रॉन अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील बावी या गावात ओमीक्रॉनचे 3 रुग्ण सापडल्याने या गावाच्या सीमा बंद करून कलम 144 लागू करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर डॉ योगेश खरमाटे यांनी काढले आहेत. बाबी या गावातील कोरोनाचा संसर्ग वाढू न देण्यासाठी तातडीने नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने हे आदेश काढण्यात आले असून बावी गावाच्यापासून तीन किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील नागरिकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. 3 किलोमीटरचा पर्यंतचा परिसर रेड झोन तर 7 किलोमीटर पर्यंतचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
बावी या गावात हे आदेश आजपासून लागू होणार आहेत, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार हे आदेश लागू करण्यात आले असून या गावात नागरिकांना फिरण्यास मज्जाव घालण्यात आला आहे तसेच बावी या गावातील सीमा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी ग्रामीण पोलिसांनी करायचे असून या गावात ठराविक वेळेत अत्यावश्यक सेवा पुरवण्याची मुभा राहील. अत्यावश्यक सेवा पुरविताना सोशल डिस्टन्सचे पालन करणे बंधनकारक असणार आहे असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ खरमाटे यांनी काढले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 65 हजार 644 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 96.91 टक्के आहे तर 67 हजार 735 पैकी 1 हजार 507 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे त्यामुळे मृत्यूचे प्रमाण हे 2.22 टक्के इतके आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 1507 मृत्यू तर 360 मृत्यू हे जिल्ह्याबाहेर उपचार घेत असताना झाले आहेत. 107 जणांचा मृत्यू हा दुर्धर आजार असल्याने झाला आहे तर पोस्ट कोविडमुळे 108 रुग्णांचा मृत्यू झाला. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.