याचिका निकाली – तेरणा कारखानाबाबत निर्णय घेण्यास जिल्हा बँकेला मनाई
ट्वेंटीवन शुगरने डीआरटी कोर्टात जावे – तेरणा पुन्हा एकदा संकटात
गौडबंगाल काय ? देशमुखांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ? – शिवसेना तारतेय तर काँग्रेसची आडकाठी
उस्मानाबाद – समय सारथी
जिल्ह्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सहकारी भाडेतत्वावर देण्याच्या निविदा प्रक्रियेबाबत लातूर येथील काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांच्या ट्वेंटीवन शुगरने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती, ही याचिका कोर्टाने निकाली काढतात ट्वेंटीवन शुगरला डीआरटी कोर्टात जाण्यास सांगितले आहे. उस्मानाबाद जिल्हा बँकेला कारखाना संदर्भात आगामी सात दिवस कोणताही निर्णय घेण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे त्यामुळे तेरणा कारखाना पुन्हा एकदा संकटात आला आहे. भैरवनाथ शुगरचे चेअरमन तथा शिवसेना आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी तेरणा कारखाना 25 वर्षासाठी उस्मानाबाद जिल्हा बँकेकडून सहकारी भाडेतत्त्वावर घेतल्यानंतर ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र तेरणा कारखाना पुन्हा एकदा कायद्याच्या संकटात सापडला आहे. शिवसेना नेत्याने तारले होते त्याच वेळी काँग्रेस नेत्याने मारले असाच काहीसा प्रकार घडला आहे.
तेरणा सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या निविदा प्रक्रियावेळी भैरवनाथ शुगर व ट्वेंटीवन निविदा खरेदी केली होती मात्र बँकेने दिलेल्या वेळेत ट्वेंटीवन शुगर अशी निविदा आली नसल्याने जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने 25 नोव्हेंबर रोजी भैरवनाथ शुगरची एकमेव निविदा स्वीकारून 25 नोव्हेंबर रोजी ती उघडली व मंजूर केली. त्यानंतर 6 डिसेंबर रोजी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर जिल्हा बँक, कारखाना अवसायक व भैरवनाथ शुगर यांच्यामध्ये 25 वर्षाचा भाडेकरारावर शिक्कामोर्तब स्वाक्षरी करण्यात आली.
तेरणा कारखाना कारखान्याला भविष्य निर्वाह निधीचे सील असल्याने ते काढण्यासह प्रत्यक्ष ताबा देऊन तेरणा कारखाना सुरू करण्याच्या अनुषंगाने युद्धपातळीवर हालचाली होत असताना ट्वेंटीवन शुगरने याचिका दाखल केल्याने या संपूर्ण प्रक्रियेला खीळ बसला आहे. डीआरटी कोर्टात तेरणाचा विषय किती काळ प्रलंबित राहतो यावर तेरणा कारखाना सुरु होण्याचे भविष्य अवलंबून आहे. तेरणा कारखाना संदर्भात कोणताही निर्णय आगामी सात दिवस घेऊ नये असे औरंगाबाद उच्च न्यायालयाने सांगत तेरणाची याचिका निकाली काढल्याने आता पुढे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.
अनुभवाचे विद्यापीठ असलेल्या देशमुखांकडून ही ‘शाळा’ का ?
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु करावा यासाठी उस्मानाबाद जिल्हा बँकेने तब्बल सहा वेळा निविदा प्रक्रिया राबविली. सुरुवातीच्या तीन वेळेस एकही निविदा विक्री होऊ शकले नाही तर चौथ्या वेळेस एक पाचव्या वेळेस शून्य तर सहा वेळेस दोन उद्योगसमूहांनी निविदा खरेदी केली. जिल्हा बँकेने निविदा प्रक्रिया राबविताना त्याची राज्यभर प्रसिद्धी केली शिवाय तेरणा हा भाडेतत्वावर द्यायचा आहे हा विषय गाजला होता. अमित देशमुख यांच्या समूहाने निविदा खरेदी केल्यानंतर त्याच कागदपत्रांमध्ये निविदा भरण्याचा अंतिम दिनांक व वेळ स्पष्ट नमूद केले होते त्यानुसार नमूद वेळेत निविदा व रक्कम भरणे अपेक्षित होते.
बँकिंग,सहकार, शिक्षण अशा विविध क्षेत्रात पिढ्यानपिढ्या दीर्घ अनुभव व नामांकित असलेल्या देशमुख समूहाने ठरवून दिलेल्या वेळेत निविदा का भरली नाही ? देशमुख समूहाला तेरणा घ्यायचाच होता तर मग ते कोणत्या वेळेचा मुहूर्त पाळत होते ? असा संतप्त सवाल तेरणाचे सभासद व शेतकरी उपस्थित करीत आहेत. देशमुख समूहाकडून अगदी शेवटच्या क्षणी टेंडर भरणेसाठी धावपळ करणे अपेक्षित नाही. देशमुख समूहाकडून याबाबत कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही हे विशेष.