नगर परिषदेच्या प्रशासकपदी नियुक्त्या – उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 पालिकावर प्रशासक
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील आठही नगर परिषद अध्यक्ष व नगरसेवक यांची मुदत संपत आल्याने नगराध्यक्ष यांच्या जागी प्रशासकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे.जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अ वर्ग उस्मानाबाद नगर परिषदेच्या प्रशासकपदी कर्तव्यदक्ष वरिष्ठ मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उस्मानाबाद नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची मुदत ३० डिसेंबर रोजी समाप्त होत आहे त्यामुळे राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्देशानुसार नगर परिषदेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अवर सचिव महेश पाठक यांनी 28 डिसेंबर रोजी मंगळवारी राज्यातील प्रशासकांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अ वर्ग उस्मानाबाद नगर परिषदेच्या प्रशासकपदी हरीकल्याण यलगट्टे यांची नियुक्ती नियुक्ती करण्यात आली आहे. यलगट्टे उस्मानाबाद नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कर्तव्यदक्ष व कार्यकुशल अधिकारी म्हणून ओळखले जातात. मुख्य अधिकारी पदावरील प्रदीर्घ अनुभव व कर्तव्यदक्ष सेवेमुळे शासनाने त्यांची प्रशासकपदी नियुक्ती केल्याचे सांगण्यात येत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद,तुळजापूर, भूम, परंडा, कळंब, उमरगा, मुरूम, नळदुर्ग या ८ नगर परिषदेच्या प्रशासकांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंगळवारी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत.
कोरोना संकटामुळे राज्यातील निवडणुका वेळेवर घेता आल्या नाहीत. त्यातच मुदत संपत आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. त्या अनुषंगाने नगरविकास विभागाचे निर्देश व महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील तरतुदीनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या नगर परिषदवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. उस्मानाबाद व कळंब नगर परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ ३० डिसेंबर रोजी संपत आहे. त्या अनुषंगाने उस्मानाबाद नगर परिषदच्या प्रशासकीपदी नप मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे तर कळंब नपच्या प्रशासकपदी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुळजापूर नगर परिषदच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असून प्रशासकपदी उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे यांची निवड करण्यात आली आहे.नळदुर्ग, उमरगा, मुरूम, भूम, परंडा नगर परिषदच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ २९ डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्या अनुषंगाने नळदुर्ग नपच्या प्रशासकपदी उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, उमरगा येथे नप मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, मुरूम येथे तहसिलदार राहुल पाटील, भूम येथे नप मुख्याधिकारी तानाजी चव्हाण तर परंडा नगर परिषदच्या प्रशासकपदी नप मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांची निवड करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी नगर परिषदच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ समाप्तीच्या दिनाकानंतर लगतच्या दिवशी नगर परिषद प्रशासक म्हणून महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार कार्य व जबाबदारी पार पाडाव्यात, असे आदेशात म्हटले आहे.