तेरणा पुन्हा एकदा कुलूपबंद ? – डीआरटी कोर्टाने दिले बँकेला आदेश, जिल्हा बँकेच्या भूमिकेकडे लक्ष
उस्मानाबाद – समय सारथी
ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा कायद्याच्या अडचणीत सापडला आहे. तेरणा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निविदा प्रक्रियावर डीआरटी कोर्टाने (कर्ज वसुली न्यायाधिकरण) जिल्हा बँकेला आदेश दिले आहेत. ट्वेंटीवन उद्योग समुहाची निविदा उघडा अथवा आपले म्हणणे सादर करा असे आदेश देण्यात आले असून यावर पुढील सुनावणी 15 जानेवारी रोजी होणार आहे. डीआरटी कोर्टाच्या आदेशाने जिल्हा बँक व साखर कारखाना दोन्हीसह भैरवनाथ शुगर अडचणीत आले आहेत.
तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या निविदा प्रक्रियेवेळी निविदा स्वीकारली नसल्याचा आरोप करीत ट्वेंटीवन शुगरने औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना डीआरटी कोर्टमध्ये जाण्याचे आदेश दिले होते त्यानुसार त्यांनी डीआरटी कोर्ट धाव घेतली असताना हे आदेश दिले. जिल्हा बँकेने ट्वेंटीवनची निविदा उघडावी अथवा आपले म्हणणे सादर करावे असे आदेश दिले आहेत.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 6 डिसेंबर रोजी जिल्हा बँक,अवसायक व भैरवनाथ शुगर यांच्यामध्ये तेरणा कारखाना भैरवनाथ उद्योगसमूहला 25 वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता मिळाली मात्र त्यानंतर भाडेतत्वावरच्या निविदा प्रक्रियावर शंका घेत ट्वेंटीवन शुगरने न्यायालयात धाव घेतली.तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला सध्या भविष्य निर्वाह निधीचे सील असून जीएसटी वस्तू व सेवा कर,महावितरण, राज्य उत्पादन शुल्क या विभागाची थकबाकी आहे.
तेरणा कारखाना 25 वर्षाच्या करारावर देण्यात आल्यानंतर तो सुरु होईल अशी अपेक्षा व आशा निर्माण झालेली असतानाच पुन्हा एकदा तेरणा न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे.तेरणा कारखाना गेल्या नऊ वर्षापासून बंद असून यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकरी,कामगार यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे जिल्हा बँकेने तेरणा बाबत तात्काळ योग्य तो कायदेशीर निर्णय घेणे गरजेचे आहे.