धाराशिव – समय सारथी
तुळजापूरसह धाराशिव जिल्ह्यातील ड्रग्ज तस्करी प्रकरण आता विधानसभेत गाजणार असुन आमदार कैलास पाटील हे यात आवाज उठवणार आहेत. आमदार कैलास पाटील हे या प्रकरणात लक्षवेधी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी या प्रकरणावर सरकारला धारेवर धरणार असुन ड्रग्ज हा तुळजापूरसह जिल्ह्यातील तरुण पिढीसाठी घातक आहे. या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे, यात एकही आरोपी सुटता कामा नये. यात कोणी राजकारण करुन तपास यंत्रणावर दबाव आणू नये, काही ठिकाणी पोलिस तपासात हस्तक्षेप होत असल्याचे दिसुन येत आहे त्याबाबत पोलिस अधीक्षक यांना बोललो आहे, यात निष्पक्षपाती चौकशी, तपास होणे गरजेचे असल्याचे आमदार कैलास पाटील म्हणाले. गुन्ह्याचे स्वरूप मोठे असल्याने नार्कोटीक्स विभागाला यात सहभागी करुन मुंबई कनेक्शनचा तपास करावा अशी मागणी कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री याच्याकडे केली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे एक ड्रग्ज सापडल्याची पोलिस केस झाली मात्र त्याच्या तपासात काही निष्पन्न झाले नाही असे ते म्हणाले. तुळजापूर ड्रग्ज तपास करीत असताना मुंबई कनेक्शन उघड झाले त्यात नंतर सोलापूर कनेक्शन उघड झाले. मुंबई व सोलापूर हे दोन्ही कनेक्शन वेगवेगळी असुन पोलिसांनी सोलापूरचा स्वतंत्र गुन्हा नोंद करुन सोलापूर लिंकचा तपास करावा अशी मागणी केली. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीवर मकोका कारवाई करुन त्यांची बँक खाती सील करुन मालमत्ता जप्त करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. तस्कर मुळे याचा तपासात काही जण पोलिस गाडीचा पाठलाग करीत होते व दबाव आणुन हस्तक्षेप करीत होते, ही बाब स्वतः पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांनी मान्य केली आहे. त्याची नोंद डायरीत घेऊन त्याचा तपास करावा, काही जणांना चौकशी करुन नोटीस देऊन सोडून दिले आहे त्याबाबत अधिकारी यांची चौकशी करावी. ज्या गाडीत ड्रग्ज सापडले त्या गाडीच्या गाडी मालकाला अद्याप आरोपी का करण्यात आले नाही ही गंभीर बाब असुन याला आजवर अभय पाठबळ कोण दिले याची चौकशी करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
गेली 3 वर्षापासुन ड्रग्ज तस्करी सुरु होती, यात अनेकांचे हात गुंतले असुन मुंबई येथील आरोपीचे व तुळजापूर येथील अटक केलेल्या काही जणांचे बँक खाते माहिती पोलिसांनी घेतली असुन सीडीआर व बँक खात्याचे व्यवहार तपासावेत. आरोपी संगीता मुळे हिचे मुंबई, लोणावळा येथे संपत्ती व सिंडीकेट असुन त्याची तपासणी करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे, यात कोणी काही पाठबळ दिल्यास त्याला सोडणार नाही प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे.