धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुख्य सुत्रधार सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू अप्पासाहेब मुळे व मुंबई येथील तस्कर संतोष अशोक खोत या 2 आरोपींची 14 दिवसांची पोलिस कोठडी 13 मार्चला संपल्यावर कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. मुळे व खोत याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली असुन 14 दिवसांच्या तपासात पोलिसांनी या दोघांच्या बँक खात्याची माहिती जमा केली असुन त्यादृष्टीने आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत. या दोघांची बँक खाते गोठवली जाणार असुन आर्थिक व्यवहारावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. ड्रग्ज खरेदीसाठी पैसे कुठून आले? कोणाला विकले, आर्थिक लाभ कोणाला झाला? सिंडीकेटचा फायनान्सर कोण याचा तपास सुरु आहे, यातून काही आरोपी निष्पन्न होऊ शकतात. ड्रग्ज प्रकरणात 16 आरोपी असुन त्यातील 6 जण जेलमध्ये आहेत, 4 जण पोलिस कोठडीत तर 2 जण फरार व 4 नावे गोपनीय आहेत.
संगीता गोळे हीचा साथीदार मुंबई येथील ड्रग्ज तस्कर संतोष खोत याला 27 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती तर तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ पिंटू मुळेला 28 फेब्रुवारला अटक करण्यात आली. एकेकाळी कर्जबाजारी ते करोडोपती असा मुळे याचा प्रवास असुन पिंटूने तुळजापूरला सर्वप्रथम ड्रग्ज आणले. 3 वर्षापासुन तो व मुंबईतील टोळी तुळजापुरात तस्करी करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. तपासात पोलिसांना काही ठिकाणी सीसीटीव्ही, आरोपीच्या मोबाईलमधील ऑडियो रेकॉर्डिंग व चॅटिंग मिळाली आहे. आरोपीचे कॉल डिटेल्स व मोबाईलमध्ये झालेले एसएमएस संभाषण यासह अन्य पुरावे मिळाले असुन त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरु आहे. पोलिसांनी आरोपीच्या आवाजाचे नमुने घेतले असुन पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
ड्रग्ज तस्करीचे 2 वेगवेगळे सिंडीकेट तुळजापुरात सक्रीय असुन पहिल्या घटनेत पोलिसांनी मुंबई कनेक्शन उघड करीत 14 फेब्रुवारी रोजी 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या जप्त केल्या यात पोलिसांनी सुरुवातीला 3 आरोपीना अटक केली आहे तर मुंबई कनेक्शनचा तपास करताना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यावरून 4 मार्च रोजी तुळजापुरात 2 ठिकाणावरून 18 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 30 पुड्या जप्त केल्या व 4 आरोपीना अटक केली, या आरोपीनी हे ड्रग्ज सोलापूर येथून विकत घेतल्याचे कबुल केले आहे. सोलापूर कनेक्शनमधुन काही नवीन नावे समोर आली असुन लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना प्रथम ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला 22 मार्च ,संतोष खोतला 27 मार्च,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 मार्चला अटक करण्यात आली. यातील अरगडे, दळवी, राठोड, संगीता गोळे, संतोष खोत व पिंटू मुळे हे 6 जण जेलमध्ये आहेत. स्वराज उर्फ पिंटू तेलंग व वैभव मुळे हे 2 आरोपी फरार आहेत. 4 नावे पोलिसांनी गोपनीय ठेवली असुन ती तपास डायरीत नमुद असुन कोर्टात दिली आहेत. सोलापूरहुन ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 4 जणांना ड्रग्जसह 4 मार्च रोजी अटक करण्यात आली. यातील चव्हाण, गाडे व सुमित याला 17 मार्च तर संकेत शिंदेला 18 मार्च पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
डिसेंबर महिन्यात ड्रग्ज तस्करी बाबत पहिली ठोस माहिती मिळाली, दुर्दैवाने 2 वेळेस ट्रॅप अपयशी ठरला मात्र तिसऱ्या वेळी यश आले असे सांगत कारवाई आपल्यामुळे झाल्याचा दावा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केला होता. 4 मार्चपासुन कोणतीही नवीन लिंक किंवा आरोपी पोलिस तपासात निष्पन्न किंवा अटक झाले नसल्याचे कागदपत्रानुसार दिसते. आमदारांचा जनसंपर्क व माहितीचे मोठे जाळे असल्याने त्यांच्या ‘टीप’ची पोलिसांना मदत होऊ शकते असा विश्वास तुळजापुरकरांना आहे. आरोपी कोण आहे ? कोणत्या पक्षाचा आहे ? जवळचा आहे की दूरचा आहे याचा विचार न करता कोणाचीही गय केली जाणार नाही. याबाबत कोणाकडे आणखी माहिती उपलब्ध असेल तर त्यांनी न डगमगता आपल्याला कळवावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले होते, त्यानंतर आमदार यांच्याकडे काही माहिती आली असेल व ती त्यांनी पोलिसांना दिली असेल अशी आशा तुळजापुरकरांना आहे.