धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात आजवर 16 आरोपी असुन त्यातील 10 जणांना अटक करण्यात आली असुन 2 आरोपी फरार आहेत तर 4 नावे निष्पन्न झाली आहेत. ते चार आरोपी कोण याची चर्चा सुरु असुन ती नावे पोलिसांनी तपास डायरीत नमुद करीत कोर्टात सादर केली आहेत, ही नावे गोपनीय ठेवण्यात पोलिसांना यश आले आहे. ते कोण ? व पोलिस त्यांना कधी अटक करणार याकडे लक्ष लागले आहे. 10 पैकी 4 जण हे न्यायालयीन कोठडीत धाराशिव जेलमध्ये आहेत तर 6 जण पोलिस कोठडीत आहेत त्यातील संतोष खोत व पिंटू मुळे याची पोलिस कोठडी 13 मार्चला संपत आहे. पिनू तेलंग व वैभव गोळे हे 2 जण फरार आहेत.
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मुंबई व सोलापूर असे 2 वेगवेगळे कनेक्शन असुन त्यात मुंबई कनेक्शनमधील 12 जण तर सोलापूर कनेक्शनमधील 4 जण अटकेत आहेत, सोलापूर कनेक्शनमधील काही नावे तपासात निष्पन्न झाली आहेत. तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना प्रथम ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला 22 मार्च ,संतोष खोतला 27 मार्च,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 मार्चला अटक करण्यात आली. सोलापूरहुन ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 4 जणांना 4 मार्चला ड्रग्जसह अटक करण्यात आली. यातील चव्हाण, गाडे व सुमित याला 17 मार्च तर संकेत शिंदेला 18 मार्च पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ठोस भुमिका स्पष्ट करीत ड्रग्ज तस्करावर कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस अधीक्षक संजय जाधव व तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत त्यामुळे पोलिसांना अपेक्षित यश मिळत आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे दिवसरात्र तपास करीत आहेत.