तेरणा कारखानाबाबत 31 जानेवारीपुर्वी निर्णय घ्या – औरंगाबाद हायकोर्टाचे डीआरटी कोर्टला आदेश
उस्मानाबाद – समय सारथी
ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखानाबाबत डीआरटी कोर्टाने (कर्ज वसुली न्यायाधिकरण) 31 जानेवारीपुर्वी निर्णय घ्यावा असे निर्देश औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिले असल्याची माहिती तेरणा बचाव संघर्ष समितीचे ऍड अजित खोत यांनी दिली.
तेरणा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निविदा प्रक्रियाचा वाद ट्वेंटीवन शुगरने डीआरटी कोर्टात (कर्ज वसुली न्यायाधिकरण) दाखल केलेल्या याचिकेमुळे प्रलंबित आहे. या प्रकरणांमध्ये 15 जानेवारी 2022 पर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेने कोणतीही कारवाई करू नये असे आदेश डीआरटी कोर्टाने दिले होते. डीआरटी कोर्टाच्या या आदेशाच्या विरोधात भैरवनाथ शुगरने औरंगाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, त्या याचिकेवर सोमवारी सुनावणी करण्यात आली. भैरवनाथ ने दाखल याचिकेत तेरणा कारखानाचे सभासद यांनी इंटर्वेंशन पिटीशन दाखल केले. भैरवनाथ व सभासद यांची इंटर्वेंशन पिटीशन याची एकत्र सुनावणी झाली त्यावेळी कोर्टाने वरील आदेश दिले.
मागील दहा वर्षांपासून बंद असलेला कारखाना जास्त काळ बंद अवस्थेत राहू नये असे अंतरिम अर्ज करतेवेळी नमूद करून तेरणा कारखाना तात्काळ चालू करण्याच्या दृष्टिकोनातून सदरील प्रकरण तात्काळ निकाल लावावे अशी कोर्टाला विनंती केली. या सर्व बाबीचा विचार न्यायालयाने करून 31 जानेवारी 2022 पर्यंत डीआरटी कोर्टातील भैरवनाथ शुगर व ट्वेंटीवन शुगर फॅक्टरी यांच्यातील प्रकरण निकाली लावावे असा आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गंगापूरवाले यांनी दिले. तेरणा संघर्ष समितीचे सदस्य, सभासद व शेतकरी या सुनावणीला हजर होते.
तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या निविदा प्रक्रियाबाबत लातूर येथील ट्वेंटीवन उद्योग समुहाने डीआरटी कोर्टात दावा दाखल केला आहे. तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या निविदा प्रक्रियेवेळी निविदा स्वीकारली नसल्याचा आरोप करीत ट्वेंटीवन शुगरने औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना डीआरटी कोर्टमध्ये जाण्याचे आदेश दिले होते त्यानुसार त्यांनी डीआरटी कोर्ट धाव घेतली आहे.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तेरणा कारखाना शिवसेना आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ उद्योगसमूहला 25 वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता मिळाली आहे त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले.