कोरोना संकटात घोटाळा ? परंडा नगर परिषद कारभाराच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती
पाणीपुरवठा, फवारणी,अंत्यविधी दर यासह २०१७ पासुन निधी खर्चाची चौकशी होणार
उस्मानाबाद – समय सारथी
कोरोना संकटात परंडा नगर परिषदेने विविध कामात घोटाळा केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी जिल्हा प्रशासन अधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी चौकशी समिती नेमली आहे. परंडा नगर परिषद कारभाराच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली असून ही समिती पाणीपुरवठा, फवारणी,अंत्यविधी दर यासह २०१७ पासुन निधीची चौकशी करणार आहे. वाशी नगर पंचायतचे मुख्याधिकारी गिरीश पंडित यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी समिती असणार असुन यात नायब तहसीलदार एस के वाबळे, लेखापाल भागवत पवार यांचा समावेश आहे. १५ दिवसात चौकशी करून अहवाल सादर करावेत असे आदेश जाधवर यांनी दिले आहेत.
परंडा नगर परिषद येथे २०१७ ते २०२१ या काळात झालेल्या कामाचे व प्राप्त झालेल्या निधीच्या खर्चाचे तसेच कोरोना काळातील निधी लेखापरीक्षण संदर्भात औरंगाबाद विभागीय आयुक्त यांच्याकडे अनिल कोरडे यांनी तक्रार केली होती त्या अनुषंगाने ही चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या तक्रारीत नगर पालिका ठेकेदार रहीम तुल्लाखान पठाण यांनी मागील काही वर्षात विविध कामांचे बोगस बिल उचलल्याचा आरोप केला आहे.
कोरोना काळात दवंडी व फवारणीचे दर कसे निश्चित केले ? फवारणीचे काम एकाच वेळी गोरडे, पठाण व श्री यश पेस्ट कंट्रोल या तीन जणांना कसे काय दिले? अंत्यविधीचे दर कसे निश्चित केले ? कोरोनाने मयत झालेल्या रुग्णाची संख्या व कोविड पोर्टलवरील नोंदणी केलेल्या मृतांची संख्या जुळते का ? याचा अहवालात समावेश करावा तसेच बॅरीगेटिंग दर निश्चिती प्रक्रिया व निविदा प्रक्रिया याची चौकशी होणार आहे. नगर परिषद परंडा यांनी पाणी टँकरची देयके अदा केली आहेत हा खर्च करताना प्रशासकीय मान्यता, पाणी मागणी केल्याची अभिलेखे यासह निविदा प्रक्रियेची चौकशी होणार आहे. या सर्व मुद्यावर नगर प्रशासन अधिकारी यांनी चौकशी केली होती मात्र त्यात मुद्देनिहाय , परिपूर्ण सविस्तर अहवाल न आल्याने व तो अहवाल त्रोटक असल्याने पुन्हा या मुद्यांची सविस्तर चौकशी होणार आहे.