धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी मुंबई येथून अटक केलेल्या महिला ड्रग्ज तस्कर संगीता गोळे हिला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली असुन तीची धाराशिव येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. संगीता हिच्या बँक खात्यावर तब्बल 5 कोटी पेक्षा अधिक बँक व्यवहार पोलीस तपासात सापडले असुन ड्रग्ज तस्करीतुन मिळालेले पैसे तिने सोने, म्युचवल फंड व मुंबई येथे स्थावर मालमत्ता विकत घेतल्याचे समोर आले आहे. संगीता हिचे सोलापूरसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील लोकांशी संपर्क असल्याचे निष्पन्न झाले आहे. तस्कर संगीता हिच्या बँक खात्यात करोडो रुपये असुन त्याचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत, त्यातून काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. अनेक लोकांची कुटुंब उध्वस्त करीत या महिलेने करोडो रुपयांची मालमत्ता कमावली आहे, ही मालमत्ता जप्तीची कारवाई पोलीस करणार का ? हे पाहावे लागेल.महिला व तिचा पती अनेकदा तुळजापूरला आले असुन काही जणांच्या संपर्कात होते.
तस्कर संगीता गोळे व तीच्या पतीकडुन तुळजापूर येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे हा गेली 3 वर्षांपासुन ड्रग्ज मुंबईतुन आणत तुळजापूर येथे विकत होता. संगीता गोळे, तिचा पती वैभव व दीर अभिनव याच्यावर अंमली पदार्थ तस्करीचे अनेक गुन्हे नोंद आहेत, हे सगळे कुटुंब ड्रग्ज तस्करीत सहभागी आहे. वैभव गोळे याच्यावर अंमली पदार्थ तस्करीचे 2 व शासकीय कामात अडथळा व कर्मचारी याला मारहाण केल्याचा एक गुन्हा नोंद आहे, तो तुळजापूर पोलिसांना वॉन्टेड असुन फरार आहे.
संगीता गोळे या महिलेला मुंबईतुन अटक करण्यात आल्यानंतर तिला 23 फेब्रुवारीला धाराशिव कोर्टात हजर करण्यात आले त्यावेळी 3 मार्चपर्यंत 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर 8 मार्च पर्यंत वाढीव 5 दिवस कोठडी दिली होती. तिला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असुन तीची धाराशिव जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तुळजापूर ड्रग्ज रॅकेट तपासात पोलिसांनी आजवर 3 वेळेस ड्रग्ज जप्त केले आहे, 63 ग्रॅम वजनाच्या त्यात 89 पुड्या ड्रग्ज होते. ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी आतापर्यंत 16 जणांना आरोपी केले असुन त्यातील 10 जणांना अटक केली आहे तर 6 आरोपी फरार आहेत. 4 आरोपी जेलमध्ये आहेत तर उर्वरित 6 जण पोलिस कोठडीत आहेत. फरार 6 आरोपीमध्ये तस्कर महिलेचा पती वैभव गोळे व तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग यांचा समावेश आहे तर 4 नावे पोलिसांनी गोपनीय ठेवली आहेत, ती डायरीत नमुद असुन कोर्टाला दिली आहेत.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ठोस भुमिका घेत ड्रग्ज तस्करावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस अधीक्षक संजय जाधव व तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत, त्यांनी अनेक मुद्दे कोर्टासमोर आणले आहेत. तामलवाडीचे पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. छोटे मासे असलेले तस्कर गळाला लागले असुन लवकरच मोठे मासे अटक होण्याची आशा आहे.