धाराशिव – समय सारथी
तुळजापूरमध्ये सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने व त्यांचा अंगरक्षक असलेल्या पोलिस संतोष इंगळे यांना धक्काबुक्की करीत मारहाण करणाऱ्या गावगुंडाविरोधात तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस संरक्षण असतानाही प्रशांत कांबळे याने माने व पोलिस कर्मचारी यास भर चौकात मारहाण केली होती. 2 वेळेस झालेल्या मारहानीच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 127(2),281,324(2),121(1),115(2),351(3),352 नुसार गुन्हा नोंद केला आहे. धमकी देणे, मारहाण करणे, शासकीय कर्तव्य बजावताना अडथळा आणणे व मारहाण करणे अशी कलमे लावली आहेत. ड्रग्ज तस्करी व अवैध प्रकारांवर कारवाईचा बडगा उगारला जात असतानाच गुंडाची दहशत कायम असल्याचे व ते पोलिसांवर शिरजोरी करीत असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.
प्रशांत कांबळे याच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी माने यांनी केली आहे. कांबळे यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद असुन त्याचे शस्त्रासोबतचे फोटो समाज माध्यमावर असुन दहशत पसरवीत असल्याचने त्याला तडीपार करावे अशी मागणी माने यांनी केली आहे. 1 मार्च रोजी राजाभाऊ माने व त्यांचा पोलिस अंगरक्षक कोळी हे धाराशिव रोडने स्कुटीवर जात असताना प्रशांत दत्तात्रय कांबळे व त्याचा मित्र याने राजाभाऊ माने यांचा रस्ता अडवून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व आता तुला जगू देणार नाही म्हणून धमकी दिली. त्यानंतर राजाभाऊ माने व त्यांचा पोलिस अंगरक्षक हे तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे गेले असता ठाणे अंमलदार यांच्या दालनात तक्रार देत असताना प्रशांत कांबळे व त्याचा मित्र याने येऊन शिवीगाळ व दंगा करण्यास सुरुवात केली.
6 मार्च रोजी सायंकाळी राजाभाऊ माने व त्यांचे पोलिस अंगरक्षक इंगळे आंबेडकर चौकातून घरी जात असताना प्रशांत दत्तात्रय कांबळे याने राजाभाऊ माने यांना जबर मारहाण केली व गळा दाबला तसेच पोलिस अंगरक्षक इंगळे हे भांडण सोडवत असताना त्यांनाही प्रशांत दत्तात्रय कांबळे याने मारहाण केली. सदरची घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाली आहे तरी देखील पोलीस गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करत आहेत असा माने यांचा आरोप आहे. 1 मार्च रोजी झालेल्या घटनेची दखल पोलीस स्टेशन तुळजापूर यांनी घेतली असती तर 6 मार्च रोजी राजाभाऊ माने व त्यांचा पोलीस अंगरक्षक यांना भर चौकात जबर मारहाण झाली नसती असे माने यांचे म्हणणे आहे