धाराशिव – समय सारथी
वडिलांचे नावे असलेल्या जमीनीचा फेर घेण्याकरीता 8 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन 3 हजार 500 रुपये स्वीकारताना एका महिला तलाठ्यास धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. लोहारा तालुक्यातील पेठसांगवी गावच्या तलाठी अश्विनी बालाजी देवनाळे असे अटक केलेल्या लाचखोर आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार यांनी त्यांचे वडिलांचे नावे असलेली जमीन त्यांचे नावे फेर घेण्याकरीता यातील तलाठी यांचेकडे अर्ज केला होता. तक्रारदार यांचे अर्जावरुन नोटीस काढुन फेर घेण्याचा अर्ज मंडळ अधिकारी यांचेकडे पाठविण्याकरीता आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 8 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 3 हजार 500 रुपये लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य करुन सदरची लाच रक्कम पंचासमक्ष स्वतः स्विकारली असता त्यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ पकडण्यात आले असून सदर आलोसे यांचेवर पोलीस ठाणे लोहारा धाराशीव येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सापळा अधिकारी म्हणुन विकास राठोड पोलीस निरीक्षक यांनी काम पाहिले.सापळा पथकात पोलीस अंमलदार नेताजी अनपट, सिध्देश्वर तावसकर, जाकेर काझी यांचा समावेश होता. पर्यवेक्षण अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे,पोलीस उप अधीक्षक यांनी तर मार्गदर्शक अधिकारी संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक यांनी काम पाहिले.