तत्कालीन मुख्याधिकारी दीपक इंगोले यांची परांड्यात करोडोंची संपत्ती – खरेदी विक्रीचे व्यवहार संशयात
लाच लुचपत विभागाने चौकशी करावी – माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांची मागणी
उस्मानाबाद – समय सारथी
परंडा नगर परिषदेचे वादग्रस्त ठरलेले तत्कालीन मुख्याधिकारी दीपक इंगोले यांची परंडा शहरात करोडोंची संपत्ती असुन हे खरेदी विक्रीचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. इंगोले यांनी अनेक प्रकरणात पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून करोडो रुपये कमाविले आणि त्यातून परंडा शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा, दुकान गाळे व प्लॉट खरेदी केल्याचा आरोप माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लाचलुचपत विभागाने करावी अशी मागणी केली आहे. इंगोले हे मुख्याधिकारी असताना त्यांनी या संपत्ती खरेदी केल्या असून त्याच्या नोंदी नगर परिषदेच्या रेकॉर्डला लावल्या आहेत.
दीपक इगोले यांनी परंडा शहरात देवगाव रोडलगत् चार प्लॉट खरेदी केले आहेत. हे प्लॉट खरेदी करताना त्यांनी पूर्वी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेतली नाही शिवाय त्यानंतर सुद्धा हे खरेदी विक्री व्यवहार लपविले. इंगोले यांनी जमीन खरेदी करताना सुरुवातीला त्यांच्या नातेवाईक यांच्या नावे जमीन खरेदी केली व नंतर त्यांच्याकडून विक्री केली तर काही मालमत्ता या स्वतःच्या नावे खरेदी केल्या. विशेष म्हणजे या खरेदी विक्री व्यवहाराचे साक्षीदार हे नगर परिषदमध्ये काम करीत असलेले कर्मचारी असून सर्व व्यवहार हे तुटपुंजी अशी रोख रक्कम देऊन केले आहेत. इंगोले यांनी सुरेश जिकरे, मसरत काझी, सत्यम पाड्रे यांच्यासह अन्य काही जणांकडून मालमत्ता खरेदी केली आहे. यात शशिकांत येवले, किरण शिंदे, जलील मुजावर, संतोष रिझिन्हे साक्षीदार आहेत.इंगोले यांनी चुकीच्या पद्धतीने अनेक प्रकरणे मंजूर केली असून त्यात लाखोंची माया कमाविल्याचा आरोप माजी आमदार पाटील यांनी केला आहे. या प्रकरणात आपण जिल्हाधिकारी यांच्यासह न्यायालयात तक्रार देणार असल्याचे पाटील म्हणाले.
कोरोना संकटात परंडा नगर परिषदेने विविध कामात घोटाळा केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी जिल्हा प्रशासन अधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी चौकशी समिती नेमली असतानाच हे प्रकरण समोर आले आहे. परंडा नगर परिषद कारभाराच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली असून ही समिती पाणीपुरवठा, फवारणी,अंत्यविधी दर यासह २०१७ पासुन निधीची चौकशी करणार आहे. वाशी नगर पंचायतचे मुख्याधिकारी गिरीश पंडित यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी समिती असणार असुन यात नायब तहसीलदार एस के वाबळे, लेखापाल भागवत पवार यांचा समावेश आहे. १५ दिवसात चौकशी करून अहवाल सादर करावेत असे आदेश दिले आहेत.