धाराशिव – समय सारथी
ड्रग्ज तस्करीत पंचायत समितीच्या माजी सभापतीच्या मुलाला अटक केल्याने खळबळ उडाली आहे. विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे हा ड्रग्ज तस्करीचा एक मोठा दुवा असुन त्याने तुळजापूर येथील अनेकांना ड्रग्जच्या सेवनाला नादी लावले आहे. सुरुवातीला काँग्रेसमध्ये असलेला व नंतर भाजपात जाऊन पंचायत समितीत सत्ता परिवर्तन करण्यात मुळेचा मोठा हात होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुळेने राजकीय स्तिथीचा फायदा घेत ड्रग्जचा व्यवसाय चांगलाच थाटला, तुळजापूरमधील नेत्यांना ड्रग्ज तस्करीची माहिती होती मात्र त्यांनी बेरजेचे राजकारण व फायद्यासाठी कानाडोळा करीत सोंग घेतले त्यामुळे हे पाप कोणाचे हा प्रश्न नागरिकांतुन विचारला जात आहे. धाराशिव जिल्ह्यात ड्रग्ज तस्करीचे सिंडिकेट असल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केला आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील व ड्रग्ज तस्कर पिंटू मुळे याचे काही फोटो समोर आले असुन त्यात त्या दोघांचे किती घनिष्ठ संबंध होते हे लक्षात येते.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सोबत सावलीसारखे वावरणारे व राजकारणात मूल्य असलेले काही नेते व्यसनात व तस्करीत गुंतले आहेत हे मुळे याच्या अटकेने स्पष्ट झाले आहे. आमदार पाटील या प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांना माहिती असलेल्या लोकांची नावे पोलिसांना सांगणार का ? जे ड्रग्जच्या आहरी गेले होते त्यांचे आमदार पाटील यांनी मनपरिवर्तन केल्यास पेडलरची मोठी साखळी सहज पोलिसांच्या जाळ्यात अडकेल असा विश्वास तुळजापूरकरांना आहे. माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, मधुकरराव चव्हाण यांच्या काळात जिल्ह्यात ड्रग्जला थारा मिळाला नाही, अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली तरी त्यांनी कधीही तशा लोकांना थारा दिला नाही मात्र गेल्या काही वर्षात त्याला राजाश्रय मिळत आहे.
तुळजापूरच्या राजकारणात मालक म्हणुन ओळख असलेल्या नेत्याने पिंटू मुळे याला अवैध धंदेबाबत अनेकदा फटकारात अंतर दिले आणि त्यानंतरच त्याने राजकीय मार्ग बदलला. गेल्या 3-4 वर्षापुर्वी मुळे याने तुळजापूर येथील काही नेत्यांना ड्रग्जची ओळख करुन दिली, ड्रग्जची नशा चढल्याने काही जण व्यसनाच्या आहरी गेले. त्यातून तुळजापूर येथील काही जणांनी मुळे याला चोप दिला होता त्यानंतर काही काळ संपर्क कमी झाला मात्र तो पर्यंत जाळे तुळजापूरात घट्ट झाले होते.
माझ्या माहिती आधारे पोलीसांनी कारवाई केल्याचा दावा आमदार पाटील यांनी जाहीरपणे करीत पोलिसांनी केलेल्या कारवाईचे श्रेय घेण्याची संधी सोडली नाही. ड्रग्ज तस्करी बाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी त्याची माहिती द्यावी न घाबरता द्यावी, नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन आमदार यांनी केले आहे.
ड्रग्ज तस्करीबाबत राज्याचे परिवह मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी स्पष्ट आक्रमक भुमिका घेतली आहे. ड्रग्ज तस्करीत पोलिस व राजकीय नेता सहभागी असल्यास त्याला जेलमध्ये घालणार असे सांगत त्यांनी खडेबोल सुनावले. ड्रग्स तस्करीचा नायनाट करण्याची जबाबदारी माझी आहे, कितीही मोठा ड्रग्ज तस्कर असला तरी त्याला व एकही ड्रग्ज तस्कर सोडला जाणार नाही. कितीही राजकीय हस्तक्षेप असला तरी प्रताप सरनाईक त्याला सोडणार नाही असे ते म्हणाले. पालकमंत्री, खासदार, पुजारी, व्यापारी, तुळजापूर येथील नागरिक रस्त्यावर उतरल्यावर आमदार पाटील यांनी मौन सोडले व श्रेय घेतले.