धाराशिव – समय सारथी
ड्रग्ज तस्करीत पंचायत समितीच्या माजी सभापतीचा मुलगा अडकल्याने खळबळ उडाली आहे. विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे हा ड्रग्ज तस्करीचा एक मोठा दुवा असुन त्याने तुळजापूर येथील अनेकांना ड्रग्जच्या सेवनाला नादी लावले आहे, गेल्या 3-4 वर्षापुर्वी त्याने तुळजापूरमधील काही नेत्यांना ड्रग्जची ओळख करुन दिली, ड्रग्जची नशा चढल्याने काही जण व्यसनाच्या आहरी गेले. सुरुवातीला काँग्रेसमध्ये असलेला व नंतर भाजपात जाऊन पंचायत समितीत सत्ता परिवर्तन करण्यात मुळेचा मोठा हात होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुळेने राजकीय स्तिथीचा फायदा घेत ड्रग्जचा व्यवसाय चांगलाच थाटला, तुळजापूर मधील नेत्यांना हे माहिती होते मात्र त्यांनी राजकीय फायद्यासाठी कानाडोळा करीत सोंग घेतले त्यामुळे हे पाप कोणाचे हा प्रश्न नागरिकांतुन विचारला जात आहे. मुळे सारख्या ड्रग्ज तस्करावर ‘विशाल’ ‘छत्र’ असलेल्याचा शोध सुरु असुन तो कोर्टात आरोपीना हजर करताना आसपास घुटमळत होता. मुळे याचे तुळजापुरात अनेक अवैध धंदे असुन त्याचाही तपास होणे गरजेचे आहे. पिंटू हा यातील एक छोटा मासा असुन मोठा मासा जाळ्यात अडकणे लवकरच अपेक्षित आहे. राजकीय पाठबळ व काही अधिकाऱ्यांची साथ असल्याने धंदा चांगलाच बोकाळला आहे. ‘विशाल’ छत्र असल्याने पेडलर नाव न घेता ‘आका’ ला वाचवण्यासाठी केसेस अंगावर घेतात. मुळे याला एकदा तुळजापूर येथील सुज्ञ मंडळीनी चांगले ठोकत प्रसाद दिला होता.
मुंबई येथील संगीता गोळे, संतोष खोत नावाच्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर मुळे याला मुंबईतुन अटक केली. मुळे हा गेली काही वर्षांपासुन मुंबई येथून ड्रग्ज आणुन तुळजापूर येथे विकत होता तसेच तो मुंबई व तुळजापूर येथील ड्रग्ज पेडलर आणि ड्रग्ज सेवन करणाऱ्या लोकांशी संपर्कात होता. माजी सभापतीचा दिवट्या पुत्र अडकल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असुन त्याच्या संपर्कातील नेते रडारवर आहेत.
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीत पोलिसांना आजपर्यंतच्या तपासात मोठे यश आले असुन यात 12 जणांना आरोपी करण्यात आले आहे. 12 पैकी 6 आरोपी अटकेत असुन 6 जण फरार आहेत, त्यातील पिनू तेलंग व वैभव गोळे यांची नावे समोर आली असुन 4 आरोपींची नावे गोपनीय आहेत. ते 4 जण कोण हे लवकरच समोर येणार असुन पोलिसांनी त्यांची नावे कोर्टात सांगितली आहेत. तपासात ड्रग्ज तस्करीचा उलघडा होत असुन आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. ड्रगज पेडलर व ड्रग्जचे सेवन करणारे पोलिसांच्या रडारवर असुन सेवन करणाऱ्याच्या माध्यमातून ड्रग्ज पेडलर, तस्कर हाती लागतात का ? याचा तपास सुरु आहे.
तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना प्रथम ड्रग्जसह तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई येथील महिला तस्कर संगीता गोळे, स्वराज उर्फ पिनू तेलंग व वैभव गोळे, मुंबई येथील संतोष खोत,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे यांना आरोपी करण्यात आले. स्वराज उर्फ पिनू तेलंग व वैभव गोळे हे 2 आरोपी फरार आहेत तर 6 आरोपीना अटक केली आहे व 4 नावे गोपनीय आहेत. पोलिस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन व उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत त्यामुळे पोलिसांना अपेक्षित यश मिळत आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत.तपास अधिकारी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक जाधव यांचा अनुभव व नेटवर्क यामुळे ड्रग्ज तस्करी पहिल्यांदा रेकॉर्डवर आली असुन आरोपीची साखळी उघड होत आहे.