धाराशिव – समय सारथी
ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला अटक केल्यानंतर धाराशिव येथील न्यायालयात हजर केले असता कोर्टाने 13 मार्चपर्यंत 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील ही 7 वी अटक आहे. मुंबई येथील संतोष खोत नावाच्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर मुळे याला मुंबईतुन अटक केली. मुळे हा गेली काही वर्षांपासुन मुंबई येथून ड्रग्ज आणुन तुळजापूर येथे विकत होता तसेच तो मुंबई व तुळजापूर येथील ड्रग्ज पेडलर आणि ड्रग्ज सेवन करणाऱ्या लोकांशी संपर्कात होता. मुळे व त्याची आई एका राजकीय पक्षाशी संबंधित असुन त्या पंचायत समितीच्या माजी सभापती होत्या. जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख यांनी सरकारच्या वतीने बाजु मांडली, त्यांचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने 13 मार्च पर्यंत पोलिस कोठडी दिली. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे स्वतः कोर्टात हजर होते, आरोपीच्या बाजुने ऍड नितीन भोसले यांनी काम पाहिले. पोलिस अधीक्षक संजय जाधव व उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत त्यामुळे पोलिसांना यश मिळत आहे.
ड्रग्ज तस्करात पोलीस योग्य दिशेने तपास करीत असुन हळूहळु फास आवळला जात आहे. ड्रग्ज तस्करीत तुळजापूर येथील स्थानिक पेडलर यांना अटक करीत पोलीस रॅकेट उघड करीत असुन म्होरक्या कोण ? याचा लवकरच उलघडा अपेक्षित आहे. तस्करीत व ड्रग्ज सेवनात गुंतलेले तुळजापूर येथील स्थानिक नेते हे इतरांच्या नावाचे सिम व मोबाईल वापरत होते. संतोष खोत या आरोपीला अटक केल्यावर कोर्टात हजर केल्यावर 13 दिवसांची 13 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. न्याय व्यवस्थेने हे प्रकरण गंभीर्याने घेतले आहे.
ड्रग्ज तस्करी प्रकरणी मुंबई येथून अटक केलेली तस्कर संगीता गोळे हिला 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. संगीता हिने संतोष खोत याच्याकडे ड्रग्ज दिले होते त्यानंतर त्याने ते तुळजापूर येथील 3 जणांना विकले. तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना 1 मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली होती त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असुन त्यांची रवानगी धाराशिव येथील कारागृहात करण्यात आली आहे. तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग हा आरोपी फरार आहे.
तुळजापूर येथे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करीची कीड लागली असुन काही स्थानिक नेते हे व्यसनाच्या आहरी गेल्याने तस्करी व इतर प्रकार वाढले आहेत. दोन स्थानिक नेत्यांच्या नावांची चर्चा आहे त्यातील एकाला व्यसनमुक्ती केंद्राचे डोस सुद्धा त्यांच्या नेत्याने पाजले आहेत. ड्रग्ज तस्करीत सगळा खेळ या टोळी व त्यांच्या चेल्यांचा आहे, तुळजापूरचा बापु सध्या याचा ‘कणा’ आहे. सुरुवातीला सेवन करण्यासाठी या नेत्यांनी ड्रग्ज आणले त्यानंतर साखळी वाढत गेली व मोठे जाळे झाले. हे नेते सराईत असुन दुसऱ्याच्या नावाचे सिम व मोबाईल पेडलरशी संपर्क साधण्यासाठी वापरत होते. ‘कणे’ पेडलरला ‘दाणे’ टाकून माल मागवायचा अशी माहिती आहे. तुळजापूरमधील एका नेत्याच्या संपर्कात अटकेतील आरोपी होते.
ड्रग्ज रॅकेटमधील साखळी, पेडलर व ज्याच्यासाठी हे ड्रग्ज आणले जात होते त्यांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर आव्हान असुन त्या दृष्टीने काम सुरु आहे, पोलीस टप्याटप्याने फास आवळत आहेत. तुळजापुरात विक्री करता येणारे अडीच लाख रुपयांचे 59 पुड्या एमडी ड्रग्स पकडण्यात धाराशिव पोलिसांना यश आले असुन पहिल्यांदाच इतकी मोठी कारवाई झाली असुन ड्रग्ज तस्करी रेकॉर्डवर आली. ड्रग्ज तस्करीत मोठे सिंडीकेट सक्रिय असल्याचा धाराशिव पोलिसांचा दावा आहे.