धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंपरी या गावात हजारोच्या संख्येने जनावरांचे डोके, पाय व इतर हाडांची साठवणूक करण्यात आली आहे. ही हाडे गोवंशाची असल्याची माहिती असुन या घटनेनंतर गोवंश हत्येचा मुद्दा समोर आला आहे. शहरात गोवंशाची कत्तल झाल्यानंतर त्यांचे डोके, पाय व इतर हाडे या ठिकाणी आणुन वाळवली जात असुन यामुळे या भागात दुर्गंधी पसरली असुन नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. गोवंश बंदी केली असली तरी कत्तल होत असल्याचे अनेक कारवाईतुन समोर आले आहे. धाराशिव, नळदुर्ग, परंडा यासह अन्य भागात मोठ्या प्रमाणात अवैध कत्तलखाने असुन स्थानिक प्रशासनाच्या वरदहस्ताने ते सुरु आहेत. काही महिन्यापुर्वी महसुल व पोलिस प्रशासनाने एकत्र कारवाई करत काही कत्तलखाने उध्वस्त केले होते ते पुन्हा सुरु झाले आहेत त्यामुळे संयुक्त कारवाई होणार का हे पाहावे लागेल.
गोवंश हत्याबंदी कायदा अंतर्गत मांसाची विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यावर कारवाई होऊ शकते, पिंपरी प्रकरणात काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी संबंधित कायदा आहे, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, 1976 आणि त्यातील सुधारणा (2015) अंतर्गत लागू केला गेला आहे. कलम 5 अंतर्गत गायी, बैल आणि वासरू यांची हत्या पूर्णतः बंदीस्त आहे. म्हैस आणि म्हशीचे वासरू यांना या बंदीमध्ये पूर्णतः समाविष्ट केलेले नाही, पण त्यासाठी काही नियम आहेत. गायीच्या मांसाची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांवर कडक शिक्षा होऊ शकते. गोवंशबंदी प्रकरणात पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. याआधी फक्त गायीच्या हत्येवर बंदी होती, परंतु 2015 मध्ये बैल आणि वासरांच्या कत्तलीवरही बंदी आणण्यात आली. वारंवार हाच गुन्हा केल्यास कठोर कारवाई होते. गुन्हेगाराच्या वाहन किंवा मालमत्तेवर जप्तीची कारवाई होऊ शकते. काही गंभीर प्रकरणांमध्ये गुन्हेगाराच्या व्यावसायिक परवान्यांवर (व्यापार परवाना, बँक खाती इ.) प्रतिबंध घातला जाऊ शकतो अशी तरतूद आहे.