धाराशिव – समय सारथी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी व कट रचल्याच्या प्रकरणात लातुर कोर्टात उद्या 25 फेब्रुवारी रोजी तारीख होणार आहे, पवनराजे निंबाळकर हत्याकांड सारखेच या प्रकरणातही आरोपी वेगवेगळे डावपेच करीत असल्याने तारीख पे तारीख असा सिलसिला सुरु आहे. 2009 साली गुन्हा नोंद झाल्यानंतर तब्बल 10 वर्षाने सीआयडीने राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, मोहन अनंत शुक्ला व सतीश रानबा मंदाडे या 3 आरोपी विरोधात लातुर कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. 2022 पासुन या प्रकरणात चार्ज फ्रेम ( आरोप निश्चिती प्रक्रिया ) न झाल्याने प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झालेली नाही. डॉ पद्मसिंह पाटील व शुक्ला हे वेगवेगळी कारणे देऊन सुनावणीस गैरहजर राहत हजेरी माफिचा अर्ज देत आहेत तर मंदाडे याच्या विरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे मात्र तो गेली दीड वर्षापासुन पोलिसांना सापडेना झाला आहे. ऍड मोहन जाधव हे तिघांच्या वतीने कोर्टात वकील आहेत. डॉ पाटील, शुक्ला व मंदाडे हे तिघेही पवनराजे हत्याकांडात आरोपी असुन त्याचं गुन्ह्यात तपासात हे प्रकरण उघड झाले होते, हत्याकांड गुन्ह्यात अण्णा हजारे हे साक्षीदार आहेत. गुन्हा नोंद झाल्यापासुन या प्रकरणाला तब्बल 15 वर्ष झाली आहेत.
अण्णा हजारे यांची पोलिसात अशी होती तक्रार –
मी समाजसेवा व भ्रष्टाचार विरोधी लढा उभारण्याचे वृत हाती घेतले आहे त्यामधूनच मी भ्रष्ट मंत्र्यांचे भ्रष्टाचार मी यापूर्वी उघडकीस आणले होते त्यापैकी डॉ पदमसिंह बाजीराव पाटील हे आहेत . तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा भ्रष्टाचार व गैरव्यवहार मी उघडकीस आणल्याने न्यायमूर्ती पी बी सावंत आयोगाच्या चौकशी वरून डॉ पदमसिंह पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळातून पायउतार व्हावे लागले होते त्यामुळे त्यांचे मनात माझे विषयी रोष निर्माण झाला होता . डॉ पाटील यांनी या खुनशी प्रवृत्तीमधूनच त्यांचे चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर व त्यांचा कारचालक यांचा कट करून खून केला होता याबाबत कळंबोली पोलिसात गुन्हा नोंद आहे . सदरच्या गुन्ह्याचा तपास मा उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयकडे सोपविला आहे . गुन्ह्याच्या तपासात पारसमल जैन याने कबुली जबाबात त्यास मोहन शुक्ला याने माझ्या खुनाची सुपारी देण्याविषयी प्रस्ताव ठेवला . त्यामुळे डॉक्टर पाटील, मंदाडे,शुक्ल,जैन व काही अन्य काही व्यक्तींनी मला जीवे ठार मारण्याचा कट रचून हत्येची सुपारी दिली आहे.
कै पवनराजे व त्यांचा ड्राईवर समद काझी हत्याकांडातील आरोपी पारसमल ताराचंद बादला ( जैन ) याने कोर्टात सीआरपीसी 164 च्या नुसार न्यायाधीश एस बी महाले यांच्यासमोर जबाब दिला. जबाबात माजी गृहमंत्री पदमसिंह पाटील यांनी अण्णा हजारे याची हत्या करण्याची 30 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे सांगत 17 पानाच्या जबाबात पवनराजे दुहेरी हत्याकांड कसे शिजले व घडले हे 25 सप्टेंबर 2009 रोजी सांगितले.या घटनेननंतर अवघ्या 4 दिवसांनी समाजसेवक किशन उर्फ अण्णा बाबुराव हजारे यांनी थेट लातूर गाठत स्वतः एमआयडीसी पोलीस ठाण्यात 29 सप्टेंबर 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पदमसिंह बाजीराव पाटील , सतीश मंदाडे , मोहन अनंत शुक्ला यांच्यासह अन्य 4 जणा विरोधात हत्येचा कट व हत्येची सुपारी दिल्याचा गुन्हा नोंद केला. न्यायमूर्ती पी बी सावंत आयोगात भ्रष्टाचारात दोषी सापडल्याने डॉ पद्मसिंह पाटील यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.