धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर पै समद काझी दुहेरी हत्याकांडाचा निर्णय मे 2025 अखेर पर्यंत देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. हत्याकांडातील मुख्य आरोपी डॉ पद्मसिंह पाटील व इतर आरोपीनी सुनावणी लांबविण्यासाठी काही कायदेशीर प्रयत्न केले तर त्यांचा जामीन कोर्टाने रद्द करावी असे आदेश दिले आहेत. डॉ पाटील हे वेगवेगळी कारणे सांगून सुनावणी लांबवीत होते, तारीख पे तारीखच्या सिलसिला विरोधात आनंदीदेवी पवनराजे निंबाळकर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती त्यावर सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले आहेत. हत्याकांडाच्या सुनावणीत आता यापुढे दिरंगाई खपवुन घेतली जाणार नाही अशा शब्दात कोर्टाने खडेबोल सुनावले. 25 सप्टेंबर 2009 रोजी अलिबाग कोर्टाने डॉ पाटील यांना 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला. या हत्याकांडातील 2 आरोपी शुटर पिंटू सिंग व दिनेश तिवारी हे अजूनही जेलमध्ये असुन इतर सर्व आरोपी जामीनावर आहेत.
4 जुलै 2011 पासुन सुमारे साडे 13 वर्षापासुन या दुहेरी खुन खटल्याची सुनावणी सुरु आहे. खासदार ओमराजे निंबाळकर व त्यांचे बंधु जयराजे निंबाळकर हे 3 जुन 2006 साली वडिलांची हत्या झाल्यानंतर न्याय मिळावा यासाठी गेली 19 वर्ष कायदेशीर लढा देत आहेत. 20 ऑगस्ट 2009 रोजी सीबीआयने डॉ पाटील यांच्यासह 9 जणांच्या विरोधात कोर्टात 5 हजार पानाचे चार्जशीट कोर्टात सादर केले त्यात पवनराजे यांची हत्या राजकीय वर्चस्वातुन झाल्याचा ठपका ठेवला. दुहेरी हत्याकांडात 4 आरोपींचा युक्तीवाद संपला आहे. उर्वरित 3 आरोपींचा युक्तीवाद बाकी असुन या प्रकरणात पुढील सुनावणी 27 फेब्रुवारी रोजी गुरुवारी होणार आहे. या खुन खटल्यातील मुख्य आरोपी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांचा युक्तीवाद संपला आहे. 20 व 21 फेब्रुवारी रोजी आरोपी शुटर दिनेश तिवारी व पिंटू सिंग चौधरी, युपीचा बसपा नेता कैलास यादव, शुटर ग्यानेंद्र उर्फ छोटू पांडे या 4 आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद संपवला तर आरोपी लातुर येथील सतीश मंदाडे, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, माजी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी या 3 जणांचा युक्तिवाद बाकी आहे तो 27 फेब्रुवारीला केला जाणार आहे. या खुन खटल्यात 9 जण आरोपी असुन मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए ए जोगळेकर यांच्या कोर्टात याची सुनावणी सुरु आहे.
आरोपी पारसमल जैन या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनला झाला असुन समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार यांची साक्ष झाली आहे. अण्णा हजारे हत्येची सुपारी प्रकरणात 25 फेब्रुवारीला लातुर कोर्टात तारीख आहे. राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पदमसिंह पाटील यांच्यासह 9 जण या रक्तरंजित हत्याकांडात आरोपी असुन त्यात डॉ पाटील यांना सीबीआयने हत्या, कट रचणे यात मुख्य आरोपी केले आहे, आनंदीदेवी राजेनिंबाळकर ह्या फिर्यादी आहेत. डॉ पाटील व त्यांचे पुत्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी भाजप प्रवेश केला, डॉ पाटील हे सक्रीय राजकारणापासुन अलिप्त आहेत.
3 जून 2006 ला पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी हे मुंबईवरून धाराशिवकडे पांढऱ्या रंगाच्या स्कोडा गाडीने येत असताना नवी मुंबई कळंबोली येथे दिवसा ढवळ्या गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. पवनराजे हे झोपलेले असताना त्यांची गाडी हात दाखवुन थांबवण्यात आली त्यानंतर ड्राईव्हरने काच खाली घेताच गोळ्या झाडण्यात आल्या. बंदूक फेकून दिल्यानंतर आरोपीनी इंडिका गाडी पनवेलच्या बेलवली जवळ सोडून दिली. हत्याकांडाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस त्यानंतर, सीआयडीने केला मात्र त्यात फारसे काही निष्पन्न झाले नाही. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांनी या खुनाचा तपास सीबीआयने करावा अशी फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने 23 ऑक्टोबर 2008 रोजी तपास सीबीआयकडे देण्यात आला.
मुंबई क्राईम ब्रांचचे तत्कालीन पोलीस सहआयुक्त राकेश मारिया यांच्या टीमला खबऱ्यामार्फत माहिती मिळाली, की जैनने मोठे काम केले आहे. 25 फेब्रुवारी 2009 ला एकेकाळी सोने व्यापारी व अनेक दरोड्याचे गुन्हे नोंद असलेल्या जैनला अटक करण्यात आली, त्याने कबुली दिली. त्यानंतर डॉ पदमसिंह पाटील यांना पवनराजे हत्याकांड प्रकरणी सीबीआयने अटक केली. खुन घटनेनंतर तब्बल 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी मुंबई येथून सीबीआयचे तत्कालीन जॉईंट डायरेक्टर ऋषीराज सिंग, पोलीस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकुर यांनी डॉ पाटील यांना अटक केली, त्यानंतर 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. डॉ पाटील यांच्या धाराशिव व मुंबई येथील घरावर सीबीआयने छापेमारी केली त्यात शस्त्रसाठा व अनेक आक्षेपहार्य बाबी सापडल्या.