धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात 3 आरोपीना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या महिलेला अटक करण्यात धाराशिव पोलिसांना यश आले आहे. संगीता गोळे या महिलेला मुंबईतुन अटक करण्यात आली असुन मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात 5 पैकी 4 आरोपीना अटक केली असुन 1 मार्च पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस अधीक्षक संजय जाधव व उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत. तामलवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ड्रग्स तस्करीबाबत आक्रमक भुमिका घेत ड्रग्ज तस्करांचा नायनाट करण्याचे व 72 तासात कारवाईचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते.
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी ड्रग्ज प्रकरणात लक्ष घातल्यानंतर धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच ड्रग्ज तस्करीचे रॅकेट उघड झाले. तुळजापुरात विक्रीसाठी येणारे अडीच लाख रुपयांचे 59 पुड्या एमडी ड्रग्स पकडण्यात पोलिसांना यश आले. तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना अटक केली असुन त्यांना कोर्टाने 1 मार्च पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस कोठडीत आरोपीनी काही बाबी सांगितल्या नंतर तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग व मुंबई येथील तस्कर संगीता गोळे यांना यात आरोपी करण्यात आले. जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख यांनी कोर्टात बाजु मांडली. सपोनि गोकुळ ठाकुर यांनी स्वतः कोर्टात हजर राहत तपासाची प्रगती व इतर माहिती कोर्टाला दिली. धाराशिव जिल्ह्यात ड्रग्ज तस्करीचे सिंडीकेट असल्याचा संशय व्यक्त करीत ते तपासण्यासाठी आरोपींची पोलिस कोठडी मिळाली आहे.