धाराशिव – समय सारथी
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याकडून 12 वी परीक्षा केंद्रात जाऊन फोटोसेशन करण्यात आल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. परीक्षा पेपर चालू असताना भेट देत फोटो काढल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण होत नसेल का हा प्रश्न निर्माण झाला आहे. विक्रम काळे यांनी 12 वी परीक्षा केंद्रावर पाहणी करत असताना फोटो केले त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. एकीकडे राज्य सरकार कॉपी मुक्त अभियान राबविण्यात व्यस्त असताना आमदारांनी केलेले फोटो सेशन वादात सापडले आहे. कॉपीमुक्त अभियान अंतर्गत परीक्षा केंद्रावर मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक गॅजेटला बंदी असते मात्र ती विक्रम काळे यांना लागू नाही का हा प्रश्न विचारला जात आहे. शिक्षक आमदार विक्रम काळे हे परीक्षा बोर्डाचे सदस्य असल्याने ते पाहणी करू शकतात पण फोटो सेशनचे माहीत नाही असे परीक्षा मंडळाच्या अधिकारी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विक्रम काळे यांनी धाराशिव मधील येडशी, सोलापूर मधील बार्शी, बीड मधील धारूर व पाथरी, परभणी जिल्यातील केंद्राला भेटी देत फोटो काढले आहेत.