धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात ड्रग्ज तस्करीचे सिंडीकेट असल्याचा पोलिसांना संशय असुन त्या दृष्टीने तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्यात आली. पोलिसांनी 9 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, सपोनि गोकुळ ठाकुर व जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख यांनी ठोस भुमिका घेत बाजु मांडल्यानंतर कोर्टाने 9 दिवसांची कोठडी दिली. ड्रग्ज प्रकरणात आरोपीच्या संख्येत वाढ झाली असुन तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग व मुंबई येथील तस्कर संगीता गोळे यांना यात आरोपी करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक संजय जाधव व उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत.
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी ड्रग्ज प्रकरणात लक्ष घातल्यानंतर धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट उघड झाले. तुळजापुरात विक्रीसाठी येणारे अडीच लाख रुपयांचे 59 पुड्या एमडी ड्रग्स पकडण्यात पोलिसांना यश आले. तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना अटक केली असुन ते अट्टल गुन्हेगार आहेत. धाराशिव न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर त्यांना 20 फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर केले गेले. ड्रग्ज प्रकरणात मुंबई येथील एका महिलेचे नाव समोर आले असुन हे ड्रग्ज तुळजापूर कोणाला विकले जाणार होते याचा तपास पोलीस करीत असुन ड्रग्ज खरेदी करणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशा धाराशिवचे सपोनि सुदर्शन कासार, पोलीस ठाणे तामलवाडीचे सपोनि गोकुळ ठाकुर, पोउपनि लोंढे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, जावेद काझी, चालक रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले, तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार माने, सलगर, सुरनर, चौगुले, चालक शेख यांच्या पथकाने कारवाई केली. तामलवाडी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.