शिक्षणाची उलटी गंगा – एकीकडे आंतरराष्ट्रीय शाळेचे स्वप्न तर दुसरीकडे सेमी इंग्रजी बंद
पर्यायी व्यवस्था, सुधारणा गरजेची – इंग्रजी शिक्षण महागणार ? शाळांचे पेव फुटणार ?
अजब फतवा – जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या निर्णय विरोधात व्यापक जन आंदोलनाचा इशारा
उस्मानाबाद – समय सारथी
राज्यासह देशात एकीकडे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचा कल वाढत असताना उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाची उलटी गंगा वाहत असल्याचे दिसत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात एकीकडे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेचे स्वप्न साकारत असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या 1 हजार 83 शाळेत सुरु असलेले सेमी इंग्रजी बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतला आहे. या निर्णयाच्या नंतर ग्रामीण भागासह शहरी भागात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून खासदार, आमदार, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मात्र गप्प आहेत.
सेमी इंग्रजी माध्यमासाठी शिक्षणाची पर्यायी व्यवस्था, सुविधा व सुधारणा गरजेची असताना सेमी इंग्रजीच बंद हा अजब निर्णय घेण्याचे काम जिल्हाधिकारी यांनी केले आहे. गरिबांचा शिक्षण हक्क पण हिरावून घेतला ? सेमी इंग्रजी शिक्षण महागणार ? अशी संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. हा निर्णय घेताना जिल्हा परिषद शाळांना अनेक निकष लावण्यात आले मात्र सेमी इंग्रजी खासगी शाळांचे काय ? नियम सर्वांना सारखा असावा ही माफक अपेक्षा व्यक्त होत आहे. इंग्रजी शिकविणारे तज्ञ शिक्षक नाहीत हा मुद्दा व इतर नियम पूर्ण नसल्याने कारण दाखविले जात आहे. सेमी इंग्रजी सुरु करताना हे निकष पाहणे व प्रशिक्षण गरजेचे होते मात्र तसे तेव्हा व पुढील काळात झाले नाही मात्र आता सुरु आहे त्याला बळकटी गरजेची होती.
मातृभाषेचे प्रेम व मातृभाषेतून शिक्षण हा गोंडस आणि भावनिक मुद्दा पुढे करून हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक स्पर्धेत काळानुरूप बदल आवश्यक असताना हा निर्णय खासगी शाळांचे पेव वाढवण्यास पोषक वातावरण निर्माण करणारा आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अनेक शाळात नावीन्य पूर्ण उपक्रम म्हणुन परदेशी भाषा शिकविणारे मेहनती शिक्षक आहेत, त्यांचा जिल्हा परिषदेने गुणगौरवही केला. मातृभाषेसोबत इंग्रजी व इतर भाषा महत्वाच्या ठरत आहेत. जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी झाल्याने त्याचा संपूर्ण ठपका व खापर सेमी इंग्रजीवर फोडत हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. पट वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी विषयच बंद केला गेला. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषद शाळेतील 27 हजार विद्यार्थी कमी झाल्याचा दावा केला आहे. 2011 साली 1 लाख 26 हजार विद्यार्थी संख्या होती ती 2019 मध्ये 99 हजार 192 पर्यंत कमी झाली.
ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेचे महत्व अनन्यसाधारण आहे. आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी व ग्रामस्थ यांना जिल्हा परिषद शाळा एकमेव आधार आहे. स्पर्धा वाढल्याने सेमी इंग्रजीचा कल वाढला आहे, त्यातच खासगी शाळेत हजारो ते लाखो रुपये शैक्षणिक खर्च न परवडणारा आहे अश्या स्तिथित जिल्हा परिषद शाळा आधार असताना सेमी इंग्रजी बंद करण्यात आले आहे त्यामुळे एकमेव पर्यायही बंद पडल्याने आगामी काळात त्याचा फटका विद्यार्थी संख्यावर होणार असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची निवड व भरती प्रक्रिया ही गुणवत्तेच्या निकषावर स्पर्धेतून होत असते मात्र अनेक खासगी शाळेत हा निकष बाजूला ठेवला जातो. जिल्हा परिषदेचे शिक्षक प्रशिक्षणानंतर चांगले शिकवू शकतात हे आजवर सिद्ध झाले आहे. इंग्रजी तज्ञ शिक्षक नसल्याने विद्यार्थी यांचे नुकसान होत आहे ही वस्तुस्तिथी आहे. शिक्षकांना शिकविणे व विद्यार्थी यांना समजून घेणे अवघड असले तरी उपलब्ध शिक्षकांना योग्य ते तांत्रिक व इतर प्रशिक्षण दिल्यास सेमी इंग्रजी वर्ग सुरु राहू शकतात. काही उणीवा आहेत तश्या जमेच्या बाजू आहेत.जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक गुणवत्ता चांगली असून त्यात नवनवीन प्रयोग करण्याऐवजी, आहे ते बंद केले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डायटच्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले नसल्याची माहिती आहे. ज्या शाळांना सेमी इंग्रजी सुरु ठेवायचे आहे त्यांना नियम पूर्ण करून ठेवता येईल.
आगामी काळात सेमी इंग्रजी बंद केल्याच्या मुद्यावर व्यापक जन आंदोलन उभे करणार असल्याचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी या प्रसंगी सांगितले. जिल्हा परिषद विद्यार्थी संख्या 27 हजाराने कमी झाली असेल तर जवळपास 600 शिक्षक अतिरिक्त ठरतात मग त्या अतिरिक्त शिक्षकांचे काय करायचे ? हा मुद्दाही जिल्हाधिकारी यांनी पाहावा. खासगी शाळांना हा पोषक निर्णय आहे. ग्रामीण भागात यामुळे आणखी पट कमी होईल. आहे त्या शिक्षकांना प्रशिक्षण देऊन व पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून पर्याय काढावा अशी मागणी दुधगावकर यांनी केली. सुविधा व तज्ञ शिक्षक नाहीत हा मुद्दाच होऊ शकत नाही, इंग्रजी जागतिक भाषा म्हणुन महत्वाची आहे. जिल्हाधिकारी यांनी त्याचा रोजचा प्रशासकीय कारभार इंग्रजी भाषेत न करता मराठी भाषेत करावा, इतरांना मातृभाषेचे ज्ञान व महत्व देण्यापेक्षा स्वतः पासून मराठी भाषा अंमलबजावणीची सुरुवात करावी असा टोला पाटील यांनी लागावला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी बंद करण्याचा अतिशय योग्य आणि कौतुकास्पद निर्णय घेतल्याबद्दल मा. जिल्हाधिकारी साहेब ,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब व शिक्षण विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद यांचे आदर्श शिक्षक समिती च्या वतीने मनस्वी आभार 🙏
गणित आणि विज्ञानातील मूलभूत संबोध आणि संकल्पना विद्यार्थ्यांना मातृभाषेतच चांगल्या प्रकारे समजतात म्हणून प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच असले पाहिजे .
. आपण घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने अतिशय योग्य व कौतुकास्पद आहे आपण घेतलेल्या निर्णयाचा मनस्वी आभार🙏
💐💐💐💐💐💐💐💐
संतोष भोजने
जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी अधि कर्मचारी महासंघ उस्मानाबाद
This comment has been removed by the author.
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी मातृभाषेतून शिक्षण द्यावे असे सुचवण्यात आले आहे त्यामुळे हा निर्णय पुढे होणारच आहे. ग्रामीण भागात मध्ये इयत्ता पहिली ते सातवी सेमी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर मुलांना आठवीपासून मराठी माध्यमाच्या खाजगी संस्था कडेच जावे लागते तेथे त्यांचे खूप नुकसान होत आहे त्यामुळे घेतलेला हा निर्णय अतिशय योग्यच आहे.