धाराशिव – समय सारथी
राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सोलापूर ते धाराशिव असा एसटी बसने प्रवास करुन प्रवाशी यांना मिळणाऱ्या सुविधा, बसची स्तिथी याचा अनुभव घेत आढावा घेतला. यावेळी शिवसेना नेते, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके, नितीन लांडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते. एसटी महामंडळाकडे असलेल्या बस पैकी 60 टक्के बसची स्तिथी खराब झाली असुन टप्याटप्याने त्याची दुरुस्ती व नवीन बस दाखल होतील, ही स्तिथी सुधारण्यास 2 ते 3 वर्षाचा काळ लागेल असे मंत्री सरनाईक म्हणाले. मंत्री झाल्यापासुन गेल्या 2 ते अडीच महिन्यात मी 4 ते 5 वेळेस एसटी बसने प्रवास केला आहे. लहानपणी मी एसटी बसने प्रवास केला होता. जुन्या बसमध्ये खळखळात जास्त होता मात्र आता नवीन बसमध्ये आवाज जास्त नाही, त्या चांगल्या प्रतीच्या आहेत, प्रवाशी यांना चांगल्या सुविधा देण्यावर भर असणार आहे त्यामुळे बसने प्रवास केला आहे असे ते म्हणाले.
बस डेपोची दुरावस्था, बस वेळेवर येत नाहीत, जुन्या बस, कर्मचारी यांना राहण्याची व्यवस्था नसते, शौचालय व स्वच्छता नसते या समस्या सगळीकडे आहेत त्या सुधारण्यावर भर असणार आहे. यासाठी आम्ही नवीन धोरण आखत आहोत. दर वर्षाला 5 हजार अश्या प्रकारे 5 वर्षात 25 हजार बस घेण्यात येणार आहेत, त्यामुळे चांगल्या बस व सुविधा मिळतील. गाव तेथे एसटी हे जे घोष वाक्य आहे हे सत्यात उतरवणार असल्याचे ते म्हणाले. बस मध्ये प्रवास केला तरच समस्या कळतील, एसी केबिनमध्ये बसून सुचना आदेश दिले तर विकास व सुधारणा होणार नाही. माझ्याकडे एसी गाडी आहे मात्र बसने प्रवास केल्यावर समस्या कळतात, राज्यातील खासदार व आमदार यांनी सुद्धा बसने प्रवास करावा. विधिमंडळ, संसदेत समस्या मांडताना, चर्चा करताना या प्रवासाची मदत होईल असे आवाहन त्यांनी केले, 2 हजार 60 बस घातल्या असुन त्या सर्वठिकाणी देण्यात येतील त्यानंतर 3 हजार बसची मागणी केली आहे त्या आल्या की दिल्या जातील, यावर्षी साडे 5 हजार बस देणार आहे असे मंत्री सरनाईक म्हणाले.
सोलापूर ते धाराशिव हा ६६ किमीहून अधिक प्रवास एसटीने केला. आपली लालपरी म्हणजे फक्त गाडी नाही, ती आहे लाखो लोकांच्या जगण्याची शिदोरी आहे अशी प्रतिक्रिया परिवहन तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिली. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यात सोलापूर, कळंब येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगाराला भेट देऊन पाहणी केली. प्रवाशांना उत्तम सुविधा आणि सुरक्षित सेवा मिळावी यासाठी विविध बाबींवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. एसटी ही केवळ प्रवासाची सुविधा नाही तर ती सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे या सेवेत अधिक सुधारणा करण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. कर्मचारी व प्रवासी यांच्या अडचणी समजून घेत, वाहतूक व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील असे पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले. परिवहनमंत्री सरनाईक यांनी गुजरात व कर्नाटक राज्याचा दौरा करुन तेथील परिवहन सेवेचा आढावा घेत तिथल्या सुविधा, यंत्रणा याची माहिती घेतली आहे.