आमदार राणाजगजीतसिंह पाटील व डॉ तानाजीराव सावंत यांनी भुमिका स्पष्ट करण्याची गरज
धाराशिव – समय सारथी
तीर्थक्षेत्र तुळजापुरात विक्री करता येणारे अडीच लाख रुपयांचे 59 पुड्या एमडी ड्रग्स पकडण्यात धाराशिव पोलिसांना यश आल्यानंतर ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र तुळजापूर व परंडा येथे एमडी ड्रग्ज मिळत असल्याचे पोलिस कारवाईवरून वारंवार समोर आले आहे. ड्रग्ज विक्री, तस्करी, गुन्हेगारी व व्यसनाने पिढी बरबाद होण्याच्या मार्गांवर आहे. काही स्थानिक नेत्यांचा राजकीय वरदहस्त या टोळ्यांना मिळत असल्याने ड्रग्ज तस्करी वाढली आहे. आमदार, लोकप्रतिनिधी म्हणुन आमदार राणाजगजीतसिंह पाटील व डॉ तानाजीराव सावंत यांनी भुमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. तुळजापूर व परंडा यासह ग्रामीण भागात तरुण व्यसनाच्या आहरी गेला असुन गुंडाना राजाश्रय मिळत आहे. तुळजापुरात तर अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या व्यसनाच्या आहरी गेल्या असुन त्यांचे चेले तस्करीत गुंतले आहेत. परंड्यात तर काही गँग यात ‘मस्त’ झाल्या असुन त्यांनी ‘बस्तान’ बसविले आहे. इंजेक्शन, गोळ्या आदी स्वरूपात ड्रग्ज विक्री केली जात आहे.
तुळजापुरात विक्रीसाठी जाणारे ड्रग्ज कोणाकडे जाणार होते याचा तपास होणे गरजेचे आहे. यात मोठा माफिया व चैन हाती लागण्याची शक्यता आहे. तुळजापुर येथे राहणारे अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड यांना ड्रग्ज तस्करीत अटक केली आहे. सपोनी कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायद्यान्वये तामलवाडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशा धाराशिवचे सपोनि सुदर्शन कासार, पोलीस ठाणे तामलवाडीचे सपोनि गोकुळ ठाकुर, पोउपनि लोंढे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, जावेद काझी, चालक रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले, तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार माने, सलगर, सुरनर, चौगुले, चालक शेख यांच्या पथकाने केली आहे