जामीन अर्ज फेटाळला – तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी यलगट्टे यांचा जेल मधील मुक्काम वाढणार – फरार बोर्डे व पवार पोलिसांना सापडेनात
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेतील फसवणूक व अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांचा जामीन अर्ज कोर्टाने नाकारला असुन त्यामुळे त्यांचा धाराशिव जिल्हा कारागृहामधील मुक्काम वाढला आहे. जामिनीसाठी आता त्यांना उच्च न्यायालय संभाजी नगर येथे जावे लागणार आहे.यलगट्टे हे धाराशिव जिल्हा कारागृहात असुन त्यांना 1 ऑगस्ट रोजी अटक केली होती.
फरार आरोपी लेखापाल सुरज बोर्डे व पवार यांनी अटक पुर्व जामिनीसाठी अर्ज केला त्यावर 17 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. कोर्टाने पोलिस तपासी अधिकारी व सरकारी वकिलांचे म्हणणे मागितले आहे तर बोर्डे व पवार हे फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. कोर्टाने सुद्धा याबाबत नाराजी व्यक्त करीत तात्काळ पकडण्याचे आदेश दिले.
27 कोटींच्या गुन्ह्यात त्रिकुट अडकले
ठेकेदार, विकास योजना व इतर खर्चाची 27 कोटी 34 लाख रुपयांची 514 प्रमाणके म्हणजे व्हाऊचर गायब प्रकरणात तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यासह तत्कालीन लेखापाल सुरज बोर्डे व अंतर्गत लेखापरीक्षक प्रशांत पवार या 3 जणांवर विविध कलमा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 27 कोटी 34 लाख रुपये रकमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके संगनमत करून जाणीवपूर्वक लेखा विभागात ठेवली नाहीत अशी तक्रार दिल्यानंतर आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या तक्रारीनंतर या महाघोटाळ्याची पोलखोल झाली आहे.
या गुन्ह्याची व्याप्ती वाढणार असून अनेक ठेकेदार यांना लाखो रुपयांची बिले देण्यात आल्याने ते रडारवर आहेत.