उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 10 फेब्रुवारी हा शेवटचा दिवस असल्याने सर्वांच्या नजरा आज होणाऱ्या घडामोडीकडे लागल्या आहेत.
शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडी जवळपास निश्चित झाली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीचे नेते यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. 15 जागापैकी शिवसेना 5, काँग्रेस 5 व राष्ट्रवादी 5 असे समसमान वाटप झाले आहे.
बैठकीला काँग्रेसचे नेते बसवराज पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील,ज्ञानेश्वर पाटील, धनंजय सावंत,सुनील चव्हाण, राष्ट्रवादीचे जीवनराव गोरे, राहुल मोटे, सुरेश बिराजदार,सक्षणा सलगर यासह पदाधिकारी उपस्तिथ होते.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या 15 जागापैकी 3 जागा ह्या बिनविरोध निघाल्या असून त्या महाविकास आघाडीच्या आहेत त्यामुळे उर्वरित 12 जागासाठी रस्सीखेच आहे.निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्या दालनात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.
भुम विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदार संघातून मधुकर मोटे यांचा एकमेव अर्ज असल्याने ते बिनविरोध झाले आहेत तर बापूराव चव्हाण व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या विरोधातील अर्ज मागे घेतल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत.
11 फेब्रुवारी रोजी चिन्ह वाटप व उमेदवार यांची अंतिम यादी प्रसिद्ध करता येणार आहे तर 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत विविध मतदान केंद्रावर मतदान करता येणार आहे तर 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. मतदान केंद्राची यादी नंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.