उस्मानाबाद व भूम परांडा मतदार संघाची जबाबदारी आमदार रोहित पवारांवर
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद व भूम परांडा या 2 मतदार संघासह 5 मतदार संघाची जबाबदारी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर देण्यात आली आहे याबाबत रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. आगामी जिल्हा परिषद,नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर पवार यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आल्याने राष्ट्रवादी पक्षात नवचैतन्य येणार का ? हे पाहावे लागेल तर जुने नवे गट तट यांचे आव्हान पवार यांच्यासमोर असणार आहे.
शरद पवार यांच्या सूचनेनुसार प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवलीय असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे. पक्षादेशानुसार आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवे-जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला जाईल आणि या विश्वासाच्या बळावरच आगामी सर्व निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.