धाराशिव – समय सारथी
तुळजापूर मंदिर विकास आराखडा मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा. तुळजाभवानी मंदिर सुशोभीकरणाद्वारे यात्रेकरूंसाठी अधिक सुविधा निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विदर्भ आणि मराठवाडा सिंचन प्रकल्प बाबतही आदेश दिले आहेत. जवळपास 2 हजार कोटी रुपयांचा तुळजापूर मंदीर विकास आराखडा तयार करण्यात आला असुन त्यात भाविक सुविधा केंद्र, दर्शन मंडप, पार्किंग, शहरात व शहराच्या प्रमुख रस्त्यावरील प्रवेशद्वारावर आकर्षक कमान, बाग बगीचे, वृध्द व दिव्यांगाकरिता लिफ्ट, ट्रॅव्हलेटर याचा समावेश असणार आहे. आराधवाडी परिसरात 108 फूट उंच पुतळा व बगीचा साकारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी देवी भवानी तलवार देतानाचा हा पुतळा मुख्य आकर्षण असणार आहे. सध्या तुळजाभवानी मंदीर व परिसर जीर्णोद्धाराचे 65 कोटी रुपयांचे काम मंदीर संस्थान स्वनिधीतुन करीत असुन त्याव्यतिरिक्त अनेक कामे विकास आराखड्यात समाविष्ट आहेत. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील, तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी अनेक संकल्पना मांडत आराखडा तयार केला आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे तिर्थक्षेत्र विकसित करण्यासाठी प्राथमिक विकास आराखडा तयार करण्यात आला होता. या विकास आराखड्यास 16 सप्टेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर आराखडा तयार करुन नागरिकांच्या सुचना व हरकतीसाठी ठेवण्यात आला, त्यावर चर्चा होऊन विकासकामे, भुसंपादन यासह अंतीम आराखडा तयार केला आहे तो मंजुरीसाठी पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ येथे राज्यातील 19 महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव उपस्थित होते.