तुळजापुर – समय सारथी
तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील सध्याचा मूळ गाभारा काढून त्या ठिकाणी 30 × 30 चा प्रशस्त गाभारा निर्मिती करावी अशी मागणी तुळजापूर येथील पुजाऱ्यांनी तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गाभाऱ्यातील भिंतीच्या शिळांना तडे गेल्याचे पुरातत्व विभागाच्या पाहणीत लक्षात आल्यावर पुजारी यांनी स्वतःहुन पुढे येत मंदीर संवर्धनासाठी ही मागणी केली आहे.
तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू असून मंदिराला पुरातन स्वरूपात आणण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. देवीच्या गर्भगृहातील मूळ भिंतीवरील मार्बल व त्याखालील स्टाईल काढल्यानंतर मूळ भिंतीच्या दगडांना तडे गेल्याचे आढळून येत आहे. सदरील भिंत म्हणावी तेवढी मजबुत दिसत नाही त्यामुळेच पुर्वी मुळ भिंतीच्या सरक्षणासाठी बाहेरच्या बाजूने दूसरी भिंत बांधण्यात आलेली दिसते.
तुळजाभवानी मंदीर विकास आराखड्याचा आत्मा म्हणजे देवीचे गर्भगृह या विकास आराखड्यातून सर्व काही मजबूत होईल. शहराच्या चहुबाजूने विकासात्मक कामे होतील. नयन रम्य असे पर्यटन स्पॉट होतील परंतु मुख्य आत्मा जर कमकुवत राहिला तर आपण केलेला सर्व विकास आराखडा कवडीमोल ठरेल त्यामुळे आता सध्याचा मूळ गाभारा काढून त्या ठिकाणी 30 × 30 चा प्रशस्त गाभारा निर्मिती करावी म्हणजे पुढील शेकडो वर्षाच्या पब्लिक पॉप्युलेशनच्या दृष्टीने ते गरजेचे आहे अशी मागणी पुजारी यांनी केली आहे. इंद्रजित साळुंके, बाळासाहेब भोसले, गणेश (आण्णा) क्षिरसागर व श्रीकृष्ण साळुंके यांनी निवेदन देत मागणी केली आहे.