उस्मानाबाद जिल्हा बँकेचा उद्या निकाल – विमान की कपबशी, निकालाकडे लक्ष
खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी 20 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 10 जागेसाठी 22 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उद्या 21 फेब्रुवारी सोमवारी मतमोजणी होणार आहे. भाजपचे विमान उडणार की महाविकास आघाडीची कपबशीचा चहा विरोधकांना पोळणार ? याचा फैसला होणार असून निकालानंतर जिल्हा बँकेचा कारभारी कोण हे ठरणार आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 केंद्रावर 808 मतदान पैकी 798 मतदार म्हणजे 98.76 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विविध कार्यकारी सेवा सोयायटी मतदार संघात 455 पैकी 452 म्हणजे 99.34% तर इतर शेती संघात 202 पैकी 199 म्हणजे 98.51% मतदान झाले.बँका संघात 151 पैकी 147 म्हणजे 97.35% टक्के मतदान झाले.एकुण 808 पैकी 798 म्हणजे अंतिम 98.76% मतदान झाले.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 15 पैकी 5 जागा बिनविरोध निघाल्या असून उर्वरित 10 जागावर लढत झाली. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महा विकास आघाडी विरुद्ध भाजपा मध्ये लढत झाली असून विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
भूम तालुका सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे मधुकर मोटे,परंडा तालुका सोसायटी गटातून शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, उमरगा तालुका सोसायटी गटातून काँग्रेसचे नेते तथा माजी चेअरमन बापूराव पाटील,वाशी तालुका सोसायटी गटातून शिवसेनेचे आमदार डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे विक्रम सावंत आणि तुळजापूर तालुका सोसायटी गटातून काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण बिनविरोध निवडून गेले आहेत.
१० संचालक पदाच्या जागेसाठी २२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते यामध्ये शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी महाविकास आघाडी व विरोधी गटातील भाजपच्या उमेदवारांसह २ अपक्षांचा समावेश आहे. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ पासून मतदान केंद्रावर सुरु मतदान झाले मतदानासाठी उस्मानाबाद 196 मतदार ,तुळजापूर 97 ,परंडा 86, भूम 85, वाशी 53 ,कळंब 130,उमरगा 107 ,लोहारा तालुक्यात 54 असे 808 मतदार होते. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.21 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद येथील महसूल भवनात सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी दिली.