मंदीर प्रवेश बंदी – तुळजाभवानी देवीच्या 7 पुजाऱ्यावर प्रशासनाची कारवाई
- खासदार ओमराजेंना गाभाऱ्यात नेहून दर्शन घडविणे भोवले
- सोन्याची नथ व गल्ला चोरी उघड तरी गुन्हा नोंद नाही ?
- माजी अध्यक्ष सुधीर कदम यांच्यासह 4 पूजाऱ्यांना दणका
उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात बेशिस्त वर्तन,कर्मचारी यांना शिवीगाळ करित प्रशासकीय कामात अडथळा आणणे, पाळी नसताना देवीच्या गाभाऱ्यात पुजारी यांनी अनधिकृत प्रवेश करणे यासह भविकांनी देवीस अर्पण करण्यासाठी दिलेली सोन्याची नथ व रोख रकमेवर डल्ला मारल्या प्रकरणी तुळजाभवानी मंदिर संस्थानने कारवाई केली आहे. भोपे पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे तुळजापूर शहर प्रमुख सुधीर किसनराव कदम – परमेश्वर यांच्यासह 4 पूजाऱ्यांना प्रत्येकी 6 महिने मंदिर प्रवेश बंदी तर इतर 3 पूजाऱ्यांना प्रत्येकी तीन महिने मंदिर प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.
पुजारी तथा शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधीर कदम यांना 2 वेगवेगळ्या प्रकरणात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात नेहून पुजा करणे कदम यांच्यासह 4 पूजाऱ्यांना भारी पडले आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा प्रशासक यांनी हे आदेश काढले आहेत त्यामुळे पुजारी वर्गात खळबळ उडाली आहे.
तुळजाभवानी मंदिरातील पुजारी सुधीर कदम- परमेश्वर, विनोद सुनील कदम – सोंजी, गजानन किरण कदम व सचिन वसंतराव अमृतराव या 4 पूजाऱ्यावर देऊळ कवायत कलम 24 व 25 प्रमाणे पुढील 6 महिन्यासाठी मंदिर प्रवेश बंदी घातली आहे असून मंदिर प्रवेश बंदी पुढील 12 महिन्यापर्यंत कायम का ? करण्यात येऊ नये याचा खुलासा 7 दिवसात खुलासा सदर करावा असे आदेश दिले आहेत. पुजारी सागर गणेश कदम, ओंकार हेमंत इंगळे व अरविंद अण्णासाहेब भोसले या 3 पूजाऱ्यांना प्रत्येकी 3 महिने मंदिर प्रवेश बंदी केली आहे तर प्रवेशबंदी पुढील 6 महिने कायम का करण्यात येऊ नये याचा खुलासा 7 दिवसात मागितला आहे.
21 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील हे त्यांच्या कार्यकर्ते सोबत दुपारी दीडच्या सुमारास देवीच्या दर्शनासाठी आले होते त्यावेळी सुरक्षा निरीक्षक यांना सुधीर कदम व इतर 3 पुजारी चोपदार दरवाजा उघडण्यासाठी सांगत होते. चावी न दिल्यानंतर त्यांनी खासदार साहेब यांना कुंकू लावायचे आहे त्यामुळे चावी द्या म्हणून सुरक्षारक्षक यांना दमदाटी करित चावी घेऊन कुलूप उघडले. त्यानंतर या सर्वांनी खासदार यांना आत घेऊन गेले ज्यामुळे मंदिर गाभाऱ्यात व चोपदार दरवाजा येथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. देवीच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी उपस्तितांची चढाओढ पाहता कायदा व सुव्यवस्थास धोका निर्माण झाला ज्यामुळे देवीच्या मूर्तीस धोका निर्माण होऊ शकत होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याआधारे या 4 जणावर कारवाई करण्यात आली आहे.
पुजारी सागर कदम यांना भाविकाने अर्पण करण्यासाठी आणलेली सोन्याची नथ व पैशाचा गल्ला चोरून नेल्या प्रकरणी 3 महिन्याची प्रवेश बंदी घातली आहे मात्र त्यांच्यावर मंदिर संस्थानने सर्व पुरावे असताना गुन्हा नोंद न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तुळजाभवानी मंदिरामध्ये कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील भाविक गोपाळ मोतीराम राठोड हे सहपरिवार देवी दर्शनासाठी आले असता त्यांनी देवीस अर्पण करण्यासाठी सोन्याची नथ व पैशाचा गल्ला आणला होता त्यावेळी पुजारी कदम यांनी मी तुमची पुजा करतो, तुम्ही लाईन मध्ये गाभाऱ्यात या असे सांगून नथ व गल्ला मी गाभाऱ्यातील दानपेटीत टाकतो असे सांगितले आणी नथ व गल्ला घरी घेऊन गेले मात्र भाविकांनी तक्रार केल्यावर सीसीटीव्ही पाहिल्यावर कदम याची पोलखोल झाल्यानंतर त्यांनी घरी जाऊन चोरलेला मुद्देमाल भाविकांना परत केला त्यानंतर भाविकांनी तो देवीस अर्पण केला व त्याची पावती भाविकांना दिली.
तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील सुरक्षा रक्षक यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करून धमकी देणे, प्रशासकीय अडथळा यासह, गोंधळ घालणे, दर्शन रांगेत भाविक घुसवून गोंधळ घातल्याने अरविंद भोसले व ओंकार इंगळे यांना 3 महिने प्रवेश बंदी घातली आहे.
तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात सकाळ व सायंकाळचे पूजेनंतर केवळ महंत, पाळीवाले पुजारी यांनाच प्रवेश करता येतो, इतर भक्तांनी व पुजारी यांनी चोपदार दरवाजा येथून दर्शन देण्यात यावे त्यांना मुख्य गाभाऱ्यात जाऊ देऊ नये असा जिल्हाधिकारी यांचा आदेश आहे मात्र या आदेशाचे ज्ञान असतानाही पुजारी सुधीर कदम यांनी पाळी नसताना मंदिर गाभाऱ्यात दमदाटी करून प्रवेश केला यामुळे त्यांना पुढील 3 महिने मंदिर प्रवेश बंदी केली आहे.