नगर परिषद निवडणुक – सदस्य संख्या निश्चितीचा आराखडा मंजुरीसाठी सादर
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 नगर परिषदेतील निवडणुकीसाठी सदस्य संख्या निश्चिती आराखडा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मान्यतेने अंतिम मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांना पाठविला असल्याची माहिती नगर परिषद प्रशासन विभागचे प्रशासकीय अधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी दिली. 2011 च्या लोकसंख्यानुसार सदस्य संख्या निश्चिती करण्यात आली असून विहित नमुन्यात सदरील माहिती देण्यात आली आहे,.
उस्मानाबाद नगर परिषदेत 20 प्रभाग असणार असून 41 नगरसेवक असणार आहेत तर तुळजापूर नगर परिषदेत 11 प्रभाग 23 नगरसेवक, नळदुर्ग येथे 10 प्रभागात 20 नगरसेवक, उमरगा नगर परिषदेत 12 प्रभाग व 25 सदस्य असणार आहेत तर मुरूम, कळंब,भूम व परांडा या 4 नगर परिषदेत प्रत्येकी 10 प्रभाग व 20 सदस्य नगरसेवक असणार आहेत. उस्मानाबाद या अ वर्ग नगर परिषद तर तुळजापूर, भूम, परांडा,उमरगा,कळंब, नळदुर्ग व मुरूम या 7 ब वर्ग नगर परिषदांसाठी निवडणूक होत आहे.
नगरसेवकांच्या निवडीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.यात प्रत्येक प्रभागातून 2 सदस्य नगरसेवक म्हणून निवडले जाणार आहेत. प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव ज्यात नगर परिषद प्रभागांची संख्या, प्रभागनिहाय अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या,क्षेत्र , सिमांकन व नकाशा याचा प्रस्ताव संबंधित मुख्याधिकारी यांनी 2 मार्च 2022 पर्यंत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य निवडणूक आयोगाला सादर करायचा आहे. प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला राज्य निवडणूक आयुक्त 7 मार्च 2022 पर्यंत मान्यता देतील. प्रारूप प्रभाग रचना व प्रभागदर्शक नकाशे अधिसूचना कलम 10 नुसार प्रसिद्ध केले जातील व त्यावर 10 मार्च पर्यंत हरकती व सूचना मागविण्या करिता ते प्रसिद्ध केले जातील.
हरकती व सूचना या 10 मार्च 2022 ते 17 मार्च 2022 या काळात मागविण्यात येतील. प्राप्त हरकती व सूचनावर 22 मार्च पर्यंत जिल्हाधिकारी सुनावणी घेतील त्यावर हरकती व सूचनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिप्राय देऊन त्यांचा अहवाल 25 मार्च पर्यंत निवडणूक आयोगाकडे पाठवतील. 1 एप्रिल 2022 पर्यंत राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देतील व त्यानंतर अंतिम अधिसूचना जिल्हाधिकारी 5 एप्रिल पर्यंत वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी व नगर परिषदांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करतील असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी काढले आहेत.