परंडा – समय सारथी
राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय व केशव सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले असुन धनंजय सावंत यांनी या घटनेचा निषेध करीत अनेक प्रश्न उपस्थितीत केले आहेत. आधी गोळीबार व त्यानंतर धमकीचे पत्र आले आहे, आमच्या जीवाला काही दगा फटका झाल्यावर पोलिस कारवाई करणार का असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून तक्रार करणार असल्याचे धनंजय सावंत यांनी सांगितले. राजकारणातुन हे सुरु आहे की इतर काही हे तपासावे अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांकडुन कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
गोळीबाराच्या घटनेतून आम्ही बाहेर पडत असतानाच हे धमकीचे पत्र आल्याने आमच्या जीवाला धोका आहे. पोलिसांना याबाबत तक्रार देऊनही गोळीबार प्रकरणाचा छडा लावला नाही त्यानंतर आता धमकी पत्र आले आहे त्याचा तपास करावा अशी मागणी त्यांनी केली. केशव सावंत व धनु सावंत तुमचा पण संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल असे या पत्रात नमुद केले असुन त्या पत्रासोबत 100 रुपयाची नोट देखील जोडली आहे. पत्रातील मजकूर हा पेन्सिलने स्केच करुन लिहला आहे. यापुर्वी धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबाराची घटना घडली होती त्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्याच्या पाठीमागील सूत्रधाराचा शोध लागलेला नसतानाच ह्या धमकीच्या लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे.
सावंत बंधु कोणाच्या रडारावर आहेत हा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. भुम, परंडा,वाशी, तुळजापूर, धाराशिव भागासह जिल्ह्यातील पवनचक्की माफिया बोकाळला असुन मुंबई पुणे येथील 3-4 गँग सक्रीय आहेत. बाउन्सर, काळ्या गाड्या, बंदुकबाजी असे दहशतीचे प्रकार वाढले आहेत. धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर 13 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजून 37 मिनिटांनी गोळीबार करण्यात आला. दोन अज्ञात इसमानी दुचाकीवर येऊन 4 राऊंड फायर केले होते त्यानंतर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य नेते हे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी 14 सप्टेंबर रोजी परंडा येथे येण्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने खळबळ उडाली होती, या गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरु असुन आरोपीचा शोध लागलेला नाही.