धाराशिव – समय सारथी
राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भुम परंडा वाशी मतदार संघांचे आमदार डॉ तानाजीराव सावंत यांना फडणवीस 3.0 मंत्रीमंडळात मंत्रीपद दिले नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरु असतानाच सावंत यांनी त्यांच्या फेसबुक व इतर सोशल मीडियावरील डीपी व इतर फोटो बदलले आहेत. शिवसैनिक असे लिहीत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पोस्ट केला आहे त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाच्या वेळी सावंत यांची महत्वाची भुमिका होती तर सत्ता परिवर्तनासाठी फडणवीस यांच्यासोबत 100 ते 150 बैठका घेतल्याचा दावा सावंत यांनी जाहीर भाषणात केला होता. सावंत हे राजकारणातील जाईंट किलर असुन एक आक्रमक नेते अशी ओळख आहे त्यामुळे सावंत आता काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. सावंतांच्या मनात काय आहे हे येत्या काळात समोर येईल. सावंत यांच्या पोस्टवरून धनुष्यबाण पक्ष चिन्हासह एकनाथ शिंदे यांना हटवण्यात आले आहे.
सावंत हे मागील मंत्रीमंडळात आरोग्यमंत्री होते मात्र त्यांना यावेळी डावलण्यात आले. सावंत यांना अजित पवारसह भाजपच्या नेत्यांनी अनेक मुद्यावर विरोध केला असल्याची माहिती आहे. सावंत यांनी आरोग्य खात्यात अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले तर मतदार संघात विकास निधी आणला. स्वनिधीतून त्यांनी अनेक कामे केली आहेत. सावंत यांना आमदार करा मी त्यांना नामदार करतो असे वचन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंडा येथील जाहीर भाषणात दिले होते मात्र त्यांनी ते पाळले नसल्याने शिवसैनिकांत नाराजी आहे. शिंदे यांनी शब्द फिरवला, आता सावंत पाटी फिरवणार अशी चर्चा होत आहे.